
बिर्याणी खायला कोणाला आवडत नाही! सर्वांना बिर्याणी प्रचंड आवडते. बिर्याणी नेहमी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं शक्य नाही. त्यामुळे अनेक जण घरीत बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा घरी बिर्याणी बनवण्याची वेळ येते, तेव्हा अनेक जण निराश होतात. कधीकधी भात शिजत नाही, तर कधीकधी मांस हवं तसं शिजत नाही. रेस्टॉरंटमधील बिर्याणीची ती दाणेदार, सुगंधित चव घरी मिळवणे अशक्य आहे का? अजिबात नाही! तुमच्या स्वयंपाकघरातील सामान्य बिर्याणीला खास बनवण्यासाठी तुम्हाला फक्त योग्य पद्धत आणि काही लहान टिप्स वापरण्याची गरज आहे. येथे बिर्याणी बनवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. त्या जाणून घ्या…
स्वादिष्ट बिर्याणीसाठी पहिली आवश्यकता म्हणजे लांब दाण्याचा बासमती तांदूळ. तांदूळ खरेदी करताना. शिजवण्यापूर्वी तांदूळ चांगला धुऊन किमान 30 मिनिटे ते 1 तास भिजवणे महत्त्वाचे आहे. यामुळे तांदळातील अतिरिक्त स्टार्च निघून जातो, त्यामुळे बिर्याणी शिजल्यानंतर चिकट होत नाही आणि तांदळाचे दाणे लांब व व्यवस्थित राहतात.
मांस किती मऊ आणि रसरशीत होईल हे मॅरिनेशनवर अवलंबून असते. मांस आंबट दही, आले-लसूण पेस्ट आणि बिर्याणीच्या खास मसाल्यांमध्ये किमान काही तास किंवा रात्रभर मॅरीनेट करा. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड मांसाच्या तंतूंना तोडते, ज्यामुळे ते आतून मऊ आणि लुसलुशीत होते.
बऱ्याच लोकांना वाटते की जास्त मसाले म्हणजे जास्त चव, जे पूर्णपणे चुकीचे आहे. वेलची, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता यांचा योग्य समतोल हेच बिर्याणीच्या खऱ्या सुगंधाचे मूळ आहे. घरी ताजे मसाले वाटून घेण्याचा प्रयत्न करा. बाजारातून विकत आणलेल्या मसाल्यांपेक्षा घरगुती गरम मसाल्याचा सुगंध खूपच तीव्र आणि जास्त काळ टिकणारा असतो.
भात आणि मांस कधीही एकत्र शिजवू नका. भात वेगळा 70 – 80 टक्के शिजेपर्यंत शिजवा आणि पाणी काढून टाका. नंतर एका मोठ्या पातेल्यात मांस आणि भाताचे थर लावा. प्रत्येक थरावर तळलेला कांदा, तूप, कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने पसरा.
बिर्याणीला शाही रंग येण्यासाठी, कृत्रिम रंगांऐवजी कोमट दुधात केशर भिजवा. यामुळे केवळ सुंदर रंगच येणार नाही, तर चवही वाढेल. त्यावर थोडे चमचे तूप आणि थोडे केवडा पाणी किंवा गुलाबजल शिंपडल्यास, त्याचा शाही थाट अधिकच खुलून दिसेल.
सर्व तयारी झाल्यावर, पातेल्याचे झाकण पिठाने घट्ट बंद करा… याला आपण ‘दम’ असं म्हणतो. ते अगदी मंद आचेवर 20 – 30 मिनिटे शिजू द्या. यामुळे मांसाचा रस आणि मसाल्यांचा सुगंध भाताच्या आतपर्यंत पोहोचतो. हेच बिर्याणीच्या खास सुगंधाचे खरे रहस्य आहे.
शिजवल्यानंतर लगेच भांडे उघडू नका. किमान 15 – 20 मिनिटे थांबा. यामुळे बिर्याणीमधील ओलावा टिकून राहील. घाई केल्यास भात तुटण्याचा धोका असतो. थोड्या वेळाने, तळापासून हळुवारपणे ढवळा आणि गरमागरम बिर्याणी ताटात वाढा.