Tiger Shroff : व्हाईट मीट, ब्लॅक कॉफी.. फिटनेस फ्रीक टायगर श्रॉफची लाइफस्टाइल कशी ?
रविवारी संध्याकाळी झालेल्या गोळीबारामुळे अभिनेता टायगर श्रॉफ सध्या बराच चर्चेत आहे. या हल्ल्यातून सुदैवाने त्याचा जीव वाचला असला तरी, त्याला काही जखमा झाल्या. टायगर श्रॉफ हा त्याचा फिटनेस आणि एनर्जीसाठी ओळखला जातो. जाणून घेऊया त्याचं डाएट

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्यावर झालेला गोळीबार आणि हल्ल्यामुळे सगळेच हादरले. फिल्म इंडस्ट्रीला देखील मोठा धक्का बसला आहे. अचानक झालेल्या गोळीबारात टायगर श्रॉफचा हात तसेच छातीवर लागलं, जखमा झाल्यात. तसेच त्याच्या ड्रायव्हरच्या हातालाही गोळी लागली. मात्र जखमी होऊनही टायगरने कार चालवत, त्याच्या ड्रायव्हरला तातडीने रुग्णालयात नेलं. टायगर श्रॉफ हा फिल्म इंडस्ट्रीतला नावजलेला स्टार आहे. त्याचा अभिनय, ॲक्शन सीक्वेन्स आणि एनर्जी तसेच फिटनेससाठी तो ओळखला जातो. त्यामागचं रहस्य म्हणजे त्याचं डाएट आणि वर्कआऊट ट्रेनिंगमधील सातत्य. टायगर श्रॉफच्या डाएटमध्ये काय काय असतं, त्याचं फिटनेस रुटीन कसं असतं ? जाणून घेऊया.
MensXP ला दिलेल्या मुलाखतीत टायगर त्याच्या फिटनेसबद्दल बोलला होता. शॉर्टकटमुळे तुम्ही काहीही मिळवू शकत नाही, असं त्याने तेव्हा सांगितलं होतं. फिट रहायचं असेल तर तुम्हाला सातत्याने, बराच काळ मेहनत करावी लागते. फिटनेस ट्रेनिंग किंवा वर्कआऊटसाठी तो किती डेडिकेटेड आहे, हेही त्याने नमूद केलं होतं. जाणून घेऊया सविस्तर
रोज असतं ट्रेनिंग
“ मी दररोज ट्रेनिंग करतो, कारण हा माझ्यासाठी जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. जर मी ट्रेनिंग केले नाही, तर मला खूप अस्वस्थ वाटते ” असं टायगर श्रॉफने आपल्या फिटनेसबद्दल बोलताना एका मुलाखतीत सांगितलं होतं. “ मी सतत स्वतःला पुढे नेत राहतो आणि कंटाळाही येत नाही. दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारची शारीरिक ॲक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे. मग तो डान्स असो, मार्शल आर्ट्स, जिममध्ये जाणं असो किंवा एखादा खेळ खेळणे – ते कोणत्याही स्वरूपात असू शकतं ” असं त्याने पुढे नमूद केलं.
टायगर श्रॉफचा फिटनेस आयडॉल कोण ?
आपल्या फिटनेसविषयी बोलताना टायगर श्रॉफने सांगितलं की, त्याला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं. इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने गोष्टी करायच्या होत्या आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्याने आपल्या इन्स्पिरेशनबद्दलही सांगितलं. टायगरने हृतिक रोशनबद्दल म्हटलं, “ मी त्याला माझा आदर्श मानतो आणि त्याच्याकडून प्रेरणा घेतो.” याशिवाय सुष्मिता सेन यांचाही त्याच्या प्रेरणास्थानांमध्ये समावेश आहे. तसेच त्याने ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचही नाव घेतलं होतं.
फिट राहण्यासाठी काय करावं ?
टायगर श्रॉफच्या मते, फिट राहण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. तो डान्सच्या माध्यमातूनही स्वतःला फिट ठेवतो. मात्र, आपल्या वर्कआउटबाबत तो खूप शिस्तीने वागतो. तो वेट ट्रेनिंग करतो आणि फिटनेससाठी ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तो सतत मेहनत घेतो. मग ते कंबरेभोवतीची चरबी कमी करणे असो, स्नायू मजबूत बनवणे असो किंवा संपूर्ण शरीराचे वजन कमी करणे असो. टायगरच्या मते, सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करावे, त्यावर लक्ष केंद्रित करावे आणि दररोज त्या दिशेने प्रयत्न करावेत. हे काही रॉकेट सायन्स नाही, असेही तो सांगतो.
कसा असतो टायगर श्रॉफचा आहार ?
एका मुलाखतीत टायगर श्रॉफने सांगितले होते की, तो दररोज ७ ते साडेआठ तास झोप घेतो. तो केवळ नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण एवढंच घेत नाही, तर दिवसभरात अनेक वेळा थोडं-थोडं खातो. टायगरला ब्रोकोली आणि ॲस्पॅरॅगससारख्या भाज्या आवडतात. तसेच तो आहारात तुपाचाही समावेश करतो. वर्कआउट करण्यापूर्वी त्याला ब्लॅक कॉफी प्यायला आवडते. याशिवाय, त्याच्या आहारात व्हाइट मीटचाही समावेश असतो. तो सहसा बाजरीची किंवा नाचणीची भाकरी खातो.
कधी कधी टायगर श्रॉफचा चीट मिल डेही असतो. तेव्हा त्याला आईस्क्रीम खायला आवडतं. गोड पदार्थांमध्ये त्याला चॉकलेट आणि जपानी पदार्थ, सुशी तसेच पिझ्झा खायलाही त्याला आवडतं.
