थंडीच्या दिवसांत घ्या गरमागरम मटार कचोरीचा आस्वाद; स्नॅक्ससाठी परफेक्ट रेसिपी
Winter Special Snacks Recipe: हिवाळ्यात हिरवे मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या मटारचा वापर करून तुम्ही घरच्या घरी खुसखुशीत आणि मसालेदार मटार कचोरी तयार करू शकता. स्नॅक्ससाठी ही रेसिपी उत्तम पर्याय आहे.

हिवाळ्याच्या दिवसांत सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खाण्याची मजाच वेगळी असते. अशावेळी हिरव्या वाटाण्यापासून तयार केलेली खुसखुशीत मटार कचोरी उत्तम पर्याय ठरू शकते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार सारणाने भरलेली ही कचोरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. विशेष म्हणजे, ही रेसिपी बनवायलाही सोपी आहे. चला तर मग, घरच्या घरी चविष्ट मटार कचोरी कशी तयार करायची ते जाणून घेऊया.
मटार कचोरी बनवण्यासाठी साहित्य
कचोरीचे पीठ बनवण्यासाठी
– दीड कप मैदा
– अर्धा कप गव्हाचे पीठ
– २ चमचे तेल
– मीठ (चवीनुसार)
फीलिंगसाठी
– दीड कप हिरवे वाटाणे (उकडलेले आणि जाडसर बारीक केलेले)
२ चमचे बेसन
– २ चमचे तेल
– १/२ टीस्पून हिंग
– १ टीस्पून जिरे
– १ टीस्पून आले (किसलेले)
– १/२ टीस्पून धने पावडर
– १ टीस्पून बडीशेप पावडर
– १ टीस्पून लाल तिखट
– १/२ टीस्पून गरम मसाला
– १/२ टीस्पून आमचूर पावडर
– १ टीस्पून हिरवी मिरची (चिरलेली)
– २ टीस्पून कोथिंबीर (चिरलेली)
– मीठ (चवीनुसार)
मटार कचोरी बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम पीठ तयार करण्यासाठी एका भांड्यात मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि २ टेबलस्पून तेल एकत्र करा. आता थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. पीठ झाकून बाजूला ठेवा. आता सारण बनवण्यासाठी प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग व जिरे टाका आणि थोडा वेळ तडतडू द्या. यानंतर त्यात वाटाणे, धने पूड, बडीशेप, लाल तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून २-३ मिनिटे परतून घ्या. यानंतर आले आणि बेसन घालून एक मिनिट परतून घ्या. आता पॅन गॅसवरून काढून टाका आणि सारण थंड करण्यासाठी ठेवा.
आता कचोरी बनवण्यासाठी प्रथम पिठापासून लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा. यानंतर एका गोळ्यावर कोरडे पीठ लावून तो लाटून घ्या. मध्यभागी एक चमचा वाटाण्याचे सारण ठेवा आणि सर्व बाजू एकत्र करुन बंद करा. यानंतर त्यावर पुन्हा कोरडे पीठ लावा आणि गोल लाटून घ्या. आता एका कढईत तेल गरम करा. त्यात लाटलेल्या कचोऱ्या टाका. गॅसची फ्लेम कमी ठेवा. कचोरी दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तुमच्या मटर कचोरी तयार आहे. गरमा गरम कचोरी चहा, हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.