इंद्रायणी नदी स्वच्छ करा, रोहित पवारांची मागणी, आदित्य ठाकरेंचं उत्तर...

इंद्रायणी नदीसह तीर्थक्षेत्राच्या सर्व नद्या महाविकास आघाडी सरकार प्रदूषणमुक्त करणार, असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

, इंद्रायणी नदी स्वच्छ करा, रोहित पवारांची मागणी, आदित्य ठाकरेंचं उत्तर…

पुणे : इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, असं आश्वासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thckeray) यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी देहू आणि आळंदी दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांसोबत बुधवारी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी इंद्रायणी नदी प्रदूषित झाली असल्याची माहिती देत नदी स्वच्छ करण्याची विनंती आदित्य ठाकरे (Aaditya Thckeray) यांना केली.

आदित्य ठाकरे यांनी दोन्ही संस्थांनच्या विश्वस्तांचे म्हणणे ऐकून घेतले आणि लवकरात लवकर इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचं काम सुरू केलं जाईल, असं आश्वासन दिलं असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.

इंद्रायणी नदीसह तीर्थक्षेत्राच्या सर्व नद्या महाविकास आघाडी सरकार प्रदूषणमुक्त करणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत, अशी  माहितीदेखील रोहित पवार यांनी ट्विटरवर दिली.

इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या संत तुकोबांच्या देहू आणि संत ज्ञानेश्वरांची समाधी असलेल्या आळंदी गावी लाखो भाविक जातात. इंद्रायणी नदीत अनेक भाविक स्नान करतात. तर काही भाविक इंद्रायणीचं पाणी तीर्थ म्हणून पितात. इंद्रायणी नदी आणि तिच्या काठी वसलेल्या देहू आणि आळंदी गावांना चांगला इतिहास असून ते तीर्थक्षेत्र आहेत. मात्र आता इंद्रायणीचं पाणी अस्वच्छ झालं आहे. या पाण्यात स्नान करणं तर लांबच हातपाय देखील धुणे आरोग्यास हानिकारक ठरु शकतं. त्यामुळे या नदीची साफसफाई होणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब आळंदी-देहू संस्थानच्या विश्वस्तांनी आदित्य ठाकरे यांच्यापुढे मांडली.

महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. पंढरपूर नंतर इंद्रायणी नदीकाठी वसलेले देहू आणि आळंदी या दोन तीर्थक्षेत्रांशी वारकऱ्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक तिथे जातात. आळंदीला संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. तर देहू गावात संत तुकारामांचा जन्म झाला होता आणि याच गावात संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे लाखो भाविक दर्शनासाठी जातात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *