BJP vs Shivsena : विधान परिषदेतील पराभवासाठी भाजपने जबाबदार धरताच शिंदे शिवसेनेची शॉकिंग मागणी, थेट मुख्यमंत्र्यांनाच..
BJP vs Shivsena : विधान परिषद निवडणुकीतील पराभवाचे महायुती अंतर्गत पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने या पराभवासाठी संपूर्णपणे एकनाथ शिंदे शिवसेनेला जबाबदार धरलं आहे. त्यावर शिवसेनेने धक्कादायक मागणी केली आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. विधान परिषदेतील एकूण पाच जागांसाठी ही निवडणूक झालेली. यात पदवीधरच्या तीन आणि शिक्षकच्या दोन जागा होत्या. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं या निवडणुकीच स्वरुप होतं. महायुतीला अपेक्षित असणारा निकाल लागला नाही. तब्बल तीन जागा महायुतीने गमावल्या. यात भाजपचा दोन ठिकाणी तर राष्ट्रवादीचा एक जागेवर पराभव झाला. शिंदेंच्या शिवसेनेने त्यांना मिळालेली अमरावती शिक्षकची जागा जिंकली. राज्यात सत्ता असूनही तीन जागा गमावाव्या लागल्या. त्यामुळे महायुतीमध्ये आता या निकालाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक्सवर पोस्ट केली. त्यात यांनी पराभवाच खापर शिंदे शिवसेनेवर फोडलं.
“शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली” असं नवनाथ बन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेने या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. “सरकारबद्दल संशय निर्माण झाला की अशा गोष्टी घडतात. मतदारांच्या मनात सरकारबाबत नाराजी दिसते आहे. भाजपने शिवसेनेवर खापर फोडणं चुकीचचं आहे” असं पुण्यातील शिंदे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर म्हणाले.
शिंदे शिवसेनेची मागणी काय?
“शिक्षकांनी जे विरोधात मतदान केलय, त्यावरुन शिक्षकांच्या मतदानानंतर त्यांची सरकारवर नाराजी दिसत आहे. नेतृत्वाने त्याची दखल घेतली पाहिजे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा भाजप-शिवसेनेची सत्ता आलेली. नेतृत्व चांगलं-वाईट यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली पाहिजे. त्यांना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे. लोकशाहीमध्ये असणारा दुवा एकत्र साधण्याचं काम एकनाथ शिंदे करतील” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
“नवनाथ बन यांना आता समजलं का? हे निवडणुकीच्या आधी समजायला पाहिजे होतं. राज्यातील नेतृत्वावरची नाराजी आहे. राज्यातील नेतृत्व बदलायला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजेत” असं रवींद्र धंगेकर म्हणाले. त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं पाहिजे अशी मागणी केली.