जरांगेंच्या ऑडिओ क्लिपबॉम्बनंतर, आता कदमांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र, केली मोठी मागणी
मराठा नेते मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिप बॉम्बनंतर आता या प्रकरणात शिवसेना आणि भाजपातच या क्लिपची चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी ५०० कोटींचा केलेला आरोप आणि त्यानंतर आज पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप सादर केल्याने खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मनोज जरांगे यांचे आंदोलन कसे बदनाम करायचे याचा कट आणि पाचशे कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असल्याने आता महायुतीतील भाजपा आणि शिंदे शिवसेना यांच्यात एकमेकांविषयीचा कलगीतुरा लागला आहे. या दरम्यान, आता या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची तपासणी करण्याची मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट देशाचे पंतप्रधान, अमित शाह , मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन आणि आपल्याला बदनाम करण्यासाठी कसे षढयंत्र रचले होते याची ऑडिओ क्लिप सादर करत आपण पाचशे कोटींचा आरोप उगाच करत नव्हतो याचा पुरावा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता या ऑडिओ क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांचा काही संबंध नाही, हे केवळ भांडण लावण्यासाठी केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी यात सर्व भाजपाचे नेते आहेत, एकही आमचा नेता नाही असे म्हटले आहे. यावर भाजपाचे नेते आशीष शेलार यांनी मैदानात उतरुन या ऑडिओ क्लिपचा भाजपाशी काही संबंध नाही, याची तपासणी व्हावी असे म्हटले आहे. तर भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एआयच्या जमान्यात काहीही करता येते असे म्हटले आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत जी ऑडिओ क्लिप पत्रकारासमोर सादर केली. या ऑडिओ क्लिपची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणे गरजेचे आहे. या चर्चेत कोण कोण बोलत आहेत? त्यातील आवाज नेमका कोणाचा आहे? संभाषण करणारी महिला कोण? याची तात्काळ चौकशी करावी. तसेच सदर ऑडिओ क्लिपमध्ये झालेल्या ५०० कोटी आरोपाबाबतची स्पष्टता महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावी, अशी मागणी शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह तसेच मोहन भागवत यांना पत्र लिहून केली आहे.
