सत्यजित प्रकरणानंतर काँग्रेसमधील अंतर्गत खदखद बाहेर?; पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Feb 06, 2023 | 11:27 PM

नाना पटोले यांच्याविरोधात आता काँग्रेसचे इतर नेतेही उघडपणे बोलतात. काँग्रेसच्या बैठकीत ४४० होल्टचा करंट लागणार, असा इशारा आशिष देशमुख यांनी पटोले यांना दिला. विदर्भात काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू होणार आहे.

सत्यजित प्रकरणानंतर काँग्रेसमधील अंतर्गत खदखद बाहेर?; पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us on

मुंबई : जे राजकारण झालं ते मला व्यथित करणारं आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहेत, असा खुलासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. सत्यजित तांबे यांच्याबाबत जेकाही झालं त्यावरून काँग्रेसमध्ये थेट दोन गट पडल्याचं दिसतं. सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचे मामा आणि बाळासाहेब थोरात यांनी व्यथित करणारं राजकारण झाल्याचं सांगितलं. नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत काम करणं कठीण झाल्याचं थोरात यांनी सांगितल्याची माहिती आहे.

थोरात यांच्या पत्रात काय?

विधान परिषद निवडणुकीदरम्यान झालेलं राजकारण व्यथित करणारं होतं. संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांना अडचणीत आण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील. अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकारिणीत माझ्याशी कोणताही सल्लामसलत न करता बरखास्त केली. पक्ष कुणाच्या घरचा नाही, अशी जाहीर वक्तव्य करण्यात आली. प्रकरण मिटविण्याऐवजी ते वाढविण्यात आलं. सार्वजनिकरीत्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली. नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अवघड झालं आहे.

हे पक्षीय राजकारण

ऑनलाईन कार्यक्रमातही सत्यजित तांबे यांचं कौतुक करत हायकमांडकडं आपलं म्हणणं कळविल्याचं सांगितलं होतं. कारण या निवडणुकीत झालेलं राजकारण व्यथित करणारं होतं. हे पक्षीय राजकारण असल्याचंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पत्र लिहीलं नसेल असं वाटते

नाना पटोले म्हणाले, लोकांच्या मूळ प्रश्नाकडं काँग्रेसचं लक्ष आहे. थोरात यांनी कुठलंही पत्र लिहीलं नसेल, असं मला वाटतं. १३ तारखेला आम्ही प्रदेश कार्यकारिणीची बैठक लावलेली आहे. त्यामध्ये घरातला प्रश्न घरात सोडविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचंही पटोले यांनी सांगितलं.

विजयानंतर पत्रकार परिषद घेत सत्यजित तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. आपल्याला उमेदवारी मिळू नये आणि बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्यासाठी हे केलं गेल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी केला.

आशिष देशमुख यांनी ही मागणी

नाना पटोले यांच्याविरोधात आता काँग्रेसचे इतर नेतेही उघडपणे बोलतात. काँग्रेसच्या बैठकीत ४४० होल्टचा करंट लागणार, असा इशारा आशिष देशमुख यांनी पटोले यांना दिला. विदर्भात काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू होणार आहे. काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत यावर चर्चा व्हावी, अशी मागणी असल्याचंही आशिष देशमुख म्हणाले.

विजय वडेट्टीवार म्हणाले, कुठलीही चर्चा ही पक्षाच्या बैठकीत व्हायला पाहिजे. कोण नाराज आहेत, कोण नाराज नाही, हे मला माहीत नाही. जो कोणी नाराज असेल त्यांनी ते पक्षाच्या प्लॅटफार्मवर ते मांडावं.