Ganesh Visarjan 2026 : गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, पोलिसांच्या लाठीचार्जमुळे कार्यकर्त्याचा मृत्यू का? भगवे ध्वज हिसकावले
Ganesh Visarjan 2026 : अहिल्यानगरच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान काल रात्री मोठा राडा झाला आहे. यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

अहिल्यानगरच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान काल रात्री मोठा राडा झाला. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेनंतर शुक्लेश्वर तरुण गणेश मंडळाचे सदस्य दीपक वागस्कर यांचा मृत्यू झाला. मात्र वाघस्कर यांचा मृत्यू नेमका लाठीचार्ज मुळे झाला की अन्यकारणाने हे शवविच्छेदनानंतरच समजणार आहे. काल रात्री उशिरा भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुक सुरू असताना अचानकपणे पोलिसांनी गणेशभक्तांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मागचं कारण अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
यात दीपक वाघस्कर या गणेश भक्ताचा मृत्यू झाल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. मिरवणूक सुरू असताना पोलिसांनी अचानकपणे विनाकारण लाठीचार्ज केला, गणेशभक्तांकडे असलेल्या गुलालाच्या गोण्या हिसकावून घेतल्या, भगवे ध्वज हिसकावून घेतले असा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केलाय.
गणेशभक्तांना शिवीगाळ करत मारहाण
तर प्रत्यक्षदर्शी गणेश भक्ताने म्हंटले आहे की, पोलिसांनी गणेशभक्तांना शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान दीपक वाघस्कर याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी लाठीचार्ज का केला? याबाबत अद्याप कोणतेही माहिती नाही.
गणेश विसर्जन मिरवणुका थांबवल्या
मात्र या घटनेनंतर भिंगार शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका थांबवण्यात आल्या होत्या. जोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई होत नाही तोपर्यंत नगर शहरातीलही गणेश विसर्जन केले जाणार नाही अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी घेतली आहे. अजूनही गणेश विसर्जन मिरवणूका थांबलेल्याच आहे.
