तिसरीतील विद्यार्थ्याचा हात चावला, गळा दाबला; शिक्षकाचा भयंकर प्रताप; अहिल्यानगरात खळबळ
अहिल्यानगरमधील एका खासगी शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. तिसरीतील आठ वर्षीय विद्यार्थ्याचा हात चावून, गळा दाबल्याचा आरोप प्राचार्यावर आहे. ही अमानुष मारहाण समोर आल्यानंतर पालकांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात प्राचार्याविरुद्ध बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिक्षक हे गुरू असतात. त्यांचा आदर ठेवला पाहिजे. आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मुलासारखं वागवलं पाहिजे असं सांगितलं जातं. मधल्या काळात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना बेदम चोप देण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे या शिक्षकांना चाप लावण्यासाठी कडक कायदे करण्यात आले. पण काही शिक्षक सुधारण्याचं नावच घेईनात. अहिल्यानगरातील एका धक्कादायक प्रकारानंतर त्याची पुन्हा प्रचिती आली आहे. एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा हात शिक्षकाने चावल्याने खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या प्राचार्यांनी इयत्ता तिसरीतील आठ वर्षीय विद्यार्थ्याचा हात चावल्याचा आणि त्याचा गळा दाबून काही सेकंद हवेत उचलून धरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात प्राचार्य गौतम बहादुर्गे यांच्याविरुद्ध बाल न्याय (JJ Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वर्षीय विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, शाळेत वर्गातील काही विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू असताना संबंधित विद्यार्थ्याने ही बाब वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी प्राचार्य गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले.
आधी कान पिळले
वर्गात आल्यानंतर प्राचार्यांनी भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळले. त्यानंतर “भांडण कसे करतात ते दाखवतो,” असे म्हणत त्यांनी तक्रार करणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा पकडून हवेत उचलले. सुमारे वीस सेकंद एक ते वीस आकडे मोजत त्याला हवेत धरून ठेवले आणि खाली सोडल्यानंतर त्याच्या हाताचा चावा घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
लेखी माफी मागतो
घरी गेल्यानंतर मुलाच्या हातावरील जखम आणि त्याची अवस्था पाहून ही घटना पालकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पालकांनी प्राचार्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, “माझ्याकडून चुकून ही घटना घडली. मी लेखी माफी मागतो,” असे त्यांनी सांगितल्याचा दावाही पालकांनी केला आहे. मात्र, एका लहान मुलावर अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक छळ करणे हा गंभीर प्रकार असून संबंधित प्राचार्यांवर कठोर कारवाई करून जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.