‘रात्री 11 वाजता PDCC बँक उघडी, टेबलावर मतदारांच्या याद्या’ आरोपांनी बारामतीत वातावरण तापलं

बारामतीमधील पीडीसीसी बँकेची मुख्य शाखा रात्री 11 वाजेपर्यंत उघडी होती. बँकेतील वसुली अधिकाऱ्याच्या टेबलावर माळेगाव साखर कारखान्यातील सभासदांच्या मतदार याद्या सापडल्या असा आरोप सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी केला आहे.

रात्री 11 वाजता PDCC बँक उघडी, टेबलावर मतदारांच्या याद्या आरोपांनी बारामतीत वातावरण तापलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 20, 2025 | 3:33 PM

सध्या बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापलं आहे. माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:च जाहीर सभेमध्ये आपल्या नावाची घोषणा केली आहे. यावरून माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि अजित पवार हे आमने-सामने आले आहेत. दरम्यान निवडणुकीवरून वातावरण तापलं असतानाच आता बारामतीमधून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सहकार बचाव पॅनलच्या वतीनं बारामतीमधील पीडीसीसी बँकेवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडीसीसी बँक रात्री 11 वाजेपर्यंत सुरू होती, तसेच बँकेत मतदार याद्या आढळून आल्याचा आरोप सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी केला आहे. कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पैशांचा वापर होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

काय आहे नेमका आरोप?

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून दोन्ही गटात आरोप -प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बारामतीमधील पीडीसीसी बँकेची मुख्य शाखा रात्री 11 वाजेपर्यंत उघडी होती. बँकेतील वसुली अधिकाऱ्याच्या टेबलावर माळेगाव साखर कारखान्यातील सभासदांच्या मतदार याद्या सापडल्या असा आरोप सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी केला आहे. रात्रीच्या सुमारास रंजन तावरे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते या बँकेत दाखल झाले होते. रात्री 11 वाजता बँकेचे वसुली अधिकारी बँकत काय करत होते? त्यांच्या टेबलवर मतदारांच्या याद्या कशासाठी होत्या? असा सवाल तावरे यांनी उपस्थित केला आहे.

एसआयटी चौकशीची मागणी

दरम्यान पीडीसीसी बँक प्रकरणात एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. हा देश नियम कायद्याने चालतो. ही बँक आहे, देशातील बँकांना गाईड लाईन आहे. त्यामुळे याबाबत पीडीसीसी बँकेकडे विचारणा केली पाहिजे. नाबार्डने या बँकेकडे कामांच्या तासांबाबत विचारना केली पाहिजे. जे बँकेत कामाला नाहीत? ते लोक कोण होते? माळेगाव कारखान्याची कागदपत्रे तिथे कशी आली? याच उत्तर मिळालं पाहिजे.पीडीसीसी बँक मोठी बँक आहे, त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.