
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारले. अजित पवार यांच्यासह ४० आमदारांचा गट त्यांच्यासोबत आल्याचा दावा केला जात आहे. हा गट भाजप-शिवसेना युतीसोबत सत्तेत सहभागी झाला. २ जुलै रोजी या सर्व घडामोडी घडल्या. त्याचवेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नवनिर्वाचित मंत्री आपल्या गावी आले. मग त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. परंतु जळगाव जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी मंत्र्यांच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे करण्यात आले.
अमळनेरचे आमदार अनिल पाटील कॅबिनेट मंत्री झाले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनिल पाटील पहिल्यांदा आपल्या अमळनेर मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर दुतर्फा उभे करण्यात आले. अमळनेर येथील एस एस पाटील आश्रमशाळेचे विद्यार्थी दोन तास रस्त्यावर उभे होते. मंत्र्यांची वाट पाहत विद्यार्थी रस्त्यावर उन्हात उभे होते. जास्त वेळ उभे राहून थकल्यामुळे विद्यार्थी शेवटी जमिनीवर बसून गेले.
आश्रमशाळेतील सुमारे शंभर विद्यार्थी रस्त्यावर उभे असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुलांचा जीव धोक्यात घालून झालेल्या या प्रकाराबद्दल नेटिझन्समधून संताप व्यक्त केला गेला. रस्त्याच्या दुतर्फा उभे करून मंत्रीमहोदयांना मानवंदनाही घडवण्याच्या या असंवेदनशील प्रकाराबद्दल नाराजी अन् संताप व्यक्त केला जात आहे.
ही आश्रमशाळा भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेची असल्याची माहिती समोर आली आहे. या शाळेतील पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गाचे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे केले गेले होते. त्यांना रस्त्यावर का उभे केले गेले? असा हा प्रश्न नेटिझन्स विचारत आहे.
राज्य महामार्गावर लहान मुलांचा जीव धोक्यात घालण्याचा या प्रकारामुळे चांगल्याच संतप्त प्रतिक्रिया आल्या? जर विद्यार्थ्यांचे काही बरे-वाईट घडले असते तर त्याची जबाबदार कोणाची? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.