बापावर आधीच कर्ज, त्यात लग्नाचं टेन्शन, शेतकऱ्याच्या Bsc पास लेकीची आत्महत्या

| Updated on: Dec 30, 2020 | 1:10 PM

अमरावतीच्या नेर पिंगळाई इथल्या एका उच्चशिक्षीत तरुणीने शेतकरी वडिलांच्या कर्जबाजारीपणामुळे मृत्यू जवळ केलाय.

बापावर आधीच कर्ज, त्यात लग्नाचं टेन्शन, शेतकऱ्याच्या Bsc पास लेकीची आत्महत्या
Follow us on

अमरावती: नेत्यांनी कितीही आश्वासनं दिली आणि सरकार कुणाचंही असलं तरी राज्यातील शेतकऱ्यांचं दु:ख काही केल्या कमी होताना दिसत नाही. विदर्भ, मराठवाड्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात वडिलांच्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या मुलींवरही आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या नेर पिंगळाई इथल्या एका उच्चशिक्षित तरुणीने शेतकरी वडिलांच्या कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला जवळ करणं पसंत केलं आणि गळफास लावून घेत आत्महत्या केली. (Suicide of a young girl due to debt bondage of a farmer father)

मोहिनी टिंगणे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. तीने B.Sc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. मोहिनीचे वडील अरुण टिंगणे यांच्याकडे 4 एकर शेती आहे. अरुण टिंगणे यांनी स्टेट बँकेकडून 4 एकर शेतीवर 1 लाख 18 हजार रुपयांचं कर्ज काढलं. यंदाच्या पिकांवर ते फिटलं जाईल अशी त्यांना अपेक्षा होती. पण अपेक्षेप्रमाणे निसर्गाची साथ लाभली नाही. सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्यानं पीक वाया गेलं. त्यामुळे संपूर्ण पिकावर रोटाव्हेटर फिरवावं लागतं. तर कपाशीवर बोंडअळी आल्यानं कापसाचं पिकही उद्ध्वस्त झालं. 4 एकरात फक्त 5 क्विंटल कापूस झाला.

अशास्थितीत यंदा मुलीचं लग्न करायचं होतं. मात्र आर्थिक अडचणीमुळे घरात चिंतेचं वातावरण होतं. B.Scला चांगले मार्क्स मिळूनही फक्त फी भरायला पैसै नसल्यानं गेल्यावर्षी M.Sc ला प्रवेश घेता आला नाही.

..म्हणून तिने जीवन संपवलं!

वडिलांना आपल्या लग्नासाठी अजून कर्जबाजारी व्हावं लागेल, त्यामुळे मोहिनीनं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आई वडील आणि भाऊ शेतात गेल्यानंतर मोहिनीने घरी ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केली. संध्याकाळी आई-वडील शेतातून घरी आल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. आर्थिक विवंचनेतून मोहिनीने उचललेल्या टोकाच्या पावलामुळं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

सोसायट्यांचे कर्ज, कौटुंबिक आणि सामाजिक अडचणी, नापिकी, ओला आणि सुका दुष्काळ, बोगस बियाणे, शासकीय मदत न मिळणे यांसारख्या अनेक कारणांनी हैराण झालेला शेतकरी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलतो. एनसीबीआरच्या आकडेवारीनुसार देशात 2019 मध्ये तब्बल 10 हजार 281 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी तीन हजार 927 शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.

संबंधित बातम्या:

”शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे”, मुलाकडून कविता सादर, 2 तासांनी वडिलांची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान, औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याचा गळफास

Suicide of a young girl due to debt bondage of a farmer father