आत्महत्येमध्ये महाराष्ट्र अव्वल, बिहारमध्ये एकही शेतकरी आत्महत्या नाही!

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2018 या एकाच वर्षात तब्बल 10 हजार 349 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer suicide) केली.

आत्महत्येमध्ये महाराष्ट्र अव्वल, बिहारमध्ये एकही शेतकरी आत्महत्या नाही!

नवी दिल्ली : देशातील शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2018 या एकाच वर्षात तब्बल 10 हजार 349 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer suicide) केली. त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे सर्वाधिक आत्महत्या (Farmer suicide) या महाराष्ट्रात झाल्या आहेत. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफी होऊनही, महाराष्ट्रात तब्बल 3 हजार 594 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. गेल्या वर्षात महाराष्ट्रात शेतकऱ्यांसह विविध आत्महत्यांचा आकडा हा 17 हजार 972 वर पोहोचला आहे. यामध्ये 3594 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

महत्त्वाचं म्हणजे बिहारसारख्या राज्याच गेल्या वर्षात एकाही शेतकरी किंवा शेतमजुराने आत्महत्या केल्याची नोंद नाही.

शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतंच

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये देशात 5763 शेतकरी आणि 4586 शेतमजुरांनी आत्महत्या केली. केवळ एकाच वर्षातील ही आकडेवारी आहे. तर शेतकऱ्यांशिवाय अन्य नागरिकांनीही आत्महत्या केल्या आहेत, या सर्वांचा आकडा मिळून 2018 मध्ये देशात 1 लाख 34 हजार 516 जणांनी आत्महत्या केली. यामध्ये महाराष्ट्रात 17 हजार 972 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

बंगाल आणि बिहारमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या नाही

महाराष्ट्रात शेतकऱ्यांसह विविध आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक असताना, तिकडे बिहारमध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. आकडेवारीनुसार पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा, उत्तराखंड, मेघालय, गोवा, चंदीगड, दमन आणि दीव, दिल्ली, लक्षद्विप आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये 2018 मध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही.

2017 पेक्षा 2018 मध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानुसार, 2018 मध्ये आत्महत्येच्या प्रमाणात 3.6 टक्के वाढ झाली आहे. 2017 मध्ये 1 लाख 29 हजार 887 जणांनी आत्महत्या केली होती.  2018 मध्ये देशात 1 लाख 34 हजार 516 जणांनी आत्महत्या केली. यंदा आत्महत्येमध्ये महाराष्ट्र 17,972 घटनांसह पहिल्या, तामिळनाडू 13896 आत्महत्येसह दुसऱ्या तर पश्चिम बंगाल 13255 आत्महत्येसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *