Nashik| नाशिकमध्ये कोरोना बळींच्या 3 हजार वारसांचे मदतीसाठी अर्ज; 50 हजार रुपये मिळणार, छाननी सुरू

| Updated on: Dec 11, 2021 | 5:56 PM

नाशिकमध्ये कोरोना बळींच्या तब्बल 3 हजार वारसांनी मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहेत. या अर्जांची सध्या छाननी सुरू आहे.

Nashik| नाशिकमध्ये कोरोना बळींच्या 3 हजार वारसांचे मदतीसाठी अर्ज; 50 हजार रुपये मिळणार, छाननी सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये कोरोना बळींच्या तब्बल 3 हजार वारसांनी मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहेत. या अर्जांची सध्या छाननी सुरू आहे. त्यानंतर पात्र ठरलेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नाशिकमध्ये हाहाकार माजवला. रुग्णालयात जागा नाही. ज्यांना जागा मिळाली त्यांना ऑक्सिजन नाही. ज्यांना ऑक्सिजन मिळाले त्यांना औषध नाही, अशी गत होती. त्यामुळे कित्येक जणांना या साथीमध्ये प्राणास मुकावे लागले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. हे पाहता सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे.

अधिक माहितीसाठी…

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांच्या 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुपये 50 हजार सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नाशिक जिल्हा नियंत्रण कक्ष (आपत्ती व्यवस्थापन प्रभाग), जुना आग्रारोड, नाशिक-1, 0253-2315080 व 2317151 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 येथे संपर्क साधावा. त्याचप्रमाणे www.nashik.gov.in या संकेतस्थळावर आणि ddmanashik@gmail.com या ई मेलवर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत, आपले अर्ज सादर केले आहेत.

यांनाही मिळाला दिलासा…

कोरोनातून अनेकजण बरे झाले. मात्र, पोस्ट कोविड आजारांमध्ये त्यांचे निधन झाले. अशांच्या वारसांनाही मदत मिळणार आहे. शिवाय अनेकांनी आरटीपीसीआर टेस्ट केली नव्हती. मात्र, ते कोरोनाबाधित होते. त्यांचे उपचारात निधन झाले. त्यांनाही सरकारची मदत मिळणार आहे. अनेक मृतांनी केवळ एचआरसीटी टेस्ट केली होती. त्या आधारे त्यांना कोरोना झाल्याचे समजले होते. त्यावरूनच त्यांचे उपचार सुरू होते. मात्र, त्यांचे त्यादरम्यान निधन झाले. अशा मृत कुटुंबाच्या वारसांनाही जिल्हा प्रशासनाकडून मदत मिळणार आहे.

8735 जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात 10 डिसेंबरपर्यंत 8735 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील जवळपास तीन हजार मृतांच्या वारसांनी मदत मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. या अर्जांची सध्या छाननी सुरू आहे. त्यानंतर त्यांना मदत मिळणार आहे. मात्र, या सानुग्रह अनुदानाबाबत कोणत्याही खासगी व्यक्ती किंवा संस्था यांना कागदपत्रे देवू नये, याबाबत पैशांची मागणी झाल्यास वरील नमूद पत्त्यावर तक्रार करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

इतर बातम्याः

Katrina and Vicky Haldi Photos : ‘गुलाबाची कली बघा हलदीनं माखली…’, हळद लागतानाही प्रेमात आकंठ बुडाले विकी-कतरिना!

Nashik | महा कृषी ऊर्जा अभियानाची यशोगाथा, जळगाव परिमंडळात 5819 शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीजजोडण्या