जळगावच्या स्टेट बँकेत भर दिवसा सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांचा गेम गावकऱ्यांनी असा पालटला

भोकर येथील स्टेट बँकेत भर दिवसा सशस्त्र दरोडा पडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. या बँकेतील मॅनेजर आणि कॅशियरला बांधून ठेवत बँकेतील रोख रक्कम आणि सोने चोरट्यांनी पळवले,परंतू ...

जळगावच्या स्टेट बँकेत भर दिवसा सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांचा गेम गावकऱ्यांनी असा पालटला
SBI Bank Robbery
| Updated on: Oct 31, 2026 | 9:12 PM

जळगाव तालुक्यातील भोकर गावातील एसबीआय ( SBI ) बँकेच्या शाखेत शनिवारी दुपारी सशस्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी शस्रास्रांच्या जोरावर बँकेतील सोने आणि चांदी तसेच रोकड लुटून नेली. या दरोडेखोरांनी शनिवारी बँकेत गर्दी कमी असते याचा फायदा घेत हा धाडसी दरोडा टाकला. यावेळी बँकेचे मॅनेजर आणि स्टाफला खूर्चीवर बांधून चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी लागलीच कारवाई करत चार दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी कमी गर्दी असल्याचे पाहून पाच ते सहा दरोडेखोरांनी दुचाकीवर बँकेच्या आवारात शिरकाव केला. त्यानंतर त्यांनी बँकेत प्रवेश मिळवत कर्मचाऱ्यांना शस्राचा धाक दाखवून धमकावले. या अचानक झालेल्या हल्ल्याने बँकेचे कर्मचारी प्रचंड घाबरले. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना कोणतीही संधी न देता. बँकेच्या तिजोरीच्या चाव्या हिसकावून बँकेतील सोने आणि रोख रक्कम बॅगेत भरली.

Loading...

दरोडेखोरांनी बँक मॅनेजर आणि कॅशियरला मारहाण केली. त्यांनी खुर्चीला बांधून त्यांनी ही चोरी केली. बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांना देखील बंदुकीचा धाक दाखवून शांत केले. त्यानंतर लुटीचा माल घेऊन हे दरोडेखोर दुचाकीवरुन पळाले. मात्र, या प्रकरणात दरोडेखोर जळगावच्या दिशेने पळून जात असताना डिकसाई गावाच्या आसपास काही गावकऱ्यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्यांना हटकले. त्यानंतर एका दरोडेखोराला गावकऱ्यांनी चोपले. इतर ठिकाणी आणखी दोन दरोडेखोरांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडील सोने ठेवलेल्या बॅगाही सापडल्या आहेत.

२७ किलो सोने असलेल्या पाच बॅगा  हस्तगत

या घटनेत दरोडेखोरांनी तब्बल २७ किलो सोन लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. २७ किलो सोने असलेल्या पाच बॅगा पोलिसांनी हस्तगत केल्या असून चार दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे.  बंदुकीचा धाक दाखवून तसेच बँकेचे व्यवस्थापक आणि रोख पाल यांना मारहाण करून खुर्चीला बांधून दरोडेखोरांनी मुद्देमाल लांबवला होता. स्टेट बँकेतून रोख रक्कम आणि सोन असा नेमका किती ऐवज चोरीला गेला त्याची माहिती घेणे सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला नसून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us