तुझ्या आई-वडिलांच्या जीवाला धोका, त्यामुळे… भोंदू बाबा अशोक खरातने सीए महिलेसोबत जे केलं…

नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आली आहे. एका CA महिलेची ८.७६ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

तुझ्या आई-वडिलांच्या जीवाला धोका, त्यामुळे... भोंदू बाबा अशोक खरातने सीए महिलेसोबत जे केलं...
ashok kharat
| Updated on: Apr 26, 2026 | 10:13 AM

स्वतःला ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्याभोवतीचा पोलिसांचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली आधीच कारागृहात असलेल्या अशोक खरातवर आता नाशिकमध्ये आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. भोंदू बाबा अशोक खरातने एका चार्टर्ड अकाउंटंट (CA) महिलेची सुमारे ८ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहे. ही महिलाअशोक खरात यांच्या शिवनिका ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून काम करत होती. २०१८ ते २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. अशोक खरातने या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानतंर त्याने तुझ्या आई-वडिलांच्या जिवाला धोका आहे, असे भीतीदायक भाकीत वर्तवले होते. कुटुंबावर आलेले हे संकट निवारण्यासाठी विशेष धार्मिक विधींच्या नावाखाली अशोक खरातने या महिलेकडून वेळोवेळी तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपये उकळले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. शुक्रवारी रात्री उशिरा याप्रकरणी खरातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांच्या आकडेवारीनुसार यातील ८ गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणी आहेत. तर ४ गुन्हे आर्थिक फसवणूक आणि खंडणीसंदर्भातील आहेत.

२६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकसह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही त्याच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहे. पोलीस त्याच्या संपूर्ण नेटवर्कचा आणि आर्थिक व्यवहारांचा कसून तपास करत आहेत. अशोक खरातला सहाव्या लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयाने २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सिन्नर तालुक्यातील त्याच्या ट्रस्टच्या माध्यमातून चालणाऱ्या संशयास्पद हालचाली, विधींच्या नावाखाली केलेली खंडणीखोरी आणि ट्रस्टच्या निधीचा गैरवापर या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली भाविकांची लूट करणाऱ्या अशा कथित आध्यात्मिक बाबांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Follow Us