कपाळी कुंकू, पेशवाई नऊवारी अन् निरांजनाने औक्षण, संभाजीनगरात G-20 च्या पाहुण्यांचे खास स्वागत, पाहा Photo

| Updated on: Feb 27, 2023 | 9:32 AM

राज्याची संस्कृती आणि शिष्टाचाराची ओळख झाल्याने मनामध्ये वेगळाच आनंद निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेक विदेशी पाहुण्यांनी विमानतळावर व्यक्त केली.

कपाळी कुंकू, पेशवाई नऊवारी अन् निरांजनाने औक्षण, संभाजीनगरात G-20 च्या पाहुण्यांचे खास स्वागत, पाहा Photo
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : G 20 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी देश (G 20 Council)-विदेशातून आलेल्या पाहुण्यांचं संभाजीनगर (Sambhajinagar) विमानतळावर नुकतंच आगमन झालं आहे. G 20 परिषदेअंतर्गत 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान जागतिक महिला परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. परिषदेसाठी विविध देशातून महिला प्रतिनिधींचे आगमन होताच त्यांचे खास मराठमोळ्या पद्धतीने औक्षण करण्यात आले. जिल्हा प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांनी पुष्पहार आणि शाल देऊन त्यांचे स्वागत केले. शिष्टमंडळ विमानतळावरुन बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासमोर लेझीमचे आणि इतर वाद्यांचे सादरीकरण केले.

ढोल-लेझीम पथकाची सलामी

विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास ढोल आणि लेझीम पथकाची सलामी देण्यात आली. विशेष म्हणजे या लेझीम पथकाची भुरळ परदेशी पाहुण्यांनाही पडली. यापैकी काहींना लेझीम वाजवून पाहण्याचा मोह आवरला नाही. ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या जिल्ह्यात जागतिक महिला परिषद होत आहे.  राज्याची संस्कृती आणि शिष्टाचाराची ओळख झाल्याने मनामध्ये वेगळाच आनंद निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेक विदेशी पाहुण्यांनी विमानतळावर व्यक्त केली.

स्वागतासाठी डॉ. भागवत कराड

विमानतळावर विदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी केंद्रीय वित्त् राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम , उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, अंजली धानोरकर, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार ज्योती पवार, निलावाड यांच्यासह लेझीम पथकाच्या अंजली चिंचोलकर यांच्यासह मुकूंदवाडी महानगर पालिकेतील शाळेच्या 18 मुली आणि 3 वादक मुले उपस्थित होते. जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा आणि वेरुळ लेणीची तसेच औरंगाबाद शहराची थोडक्यात माहिती डॉ कराड यांनी शिष्टमंडळाला दिली. दोन दिवसीय या परिषदेमध्ये तसेच विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.

विदेशातील 38 महिला सदस्यांचं आगमन

आज संभाजीनगरात जवळपास जी -२० च्या ३८ महिला सदस्यांचं आगमन झालं. यात यामध्ये एंजेला जू-ह्यून कांग, डॉ.संध्या पुरेचा, बन्सुरी स्वराज, डॉ.शमिका रवी, रविना टंडन, भारती घोष, केसेनिया शेवत्सोवा, एलेना म्याकोटनिकोवा, केल्सी हॅरिस, समंथा जेन हंग, प्रभिओत खान, आयेशा अक्तर, कार्लो सोल्डातिनी, उंडा लॉरा सब्बादिनी, जिओव्हाना आयेलिस, मार्टिना रोगाटो, स्टेफानो डी ट्रेलिया, एल्विरा मारास्को, व्हेनेसा डी अलेस्सांद्रे, अँड्रिया ग्रोबोकोपटेल, सिल्व्हिया तारोझी, निकोलस बोरोव्स्की, कॅथरीना मिलर, हदरियानी उली तिरु इडा सी, येणें क्रिसंती, इस्तियानी सुरोनो, श्री वुर्यानिंगसिह, तंत्री किरणदेवी, हरियाणा हुताबरात, जॉइस फ्रान्सिस्का कार्ला यास्मिन, डेनाटालाइट क्रिस्डेमेरिया, डेनाटली क्रिस्डेमेरिया, फराहदिभा तेन्रीलेंबा, गुल्डन तुर्कन, यांचा समावेश आहे.