Aurangabad | शहरात Raj Thackeray यांच्या विरोधात बॅनरबाजी, संघटनांची कोर्टात जाण्याची तयारी, औरंगाबाद मनसेची भूमिका काय?

| Updated on: Apr 21, 2022 | 11:28 AM

राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी शहरात विरोधी संघटना आक्रमक, तर औरंगाबाद मनसेतर्फेही वातावरण निर्मिती

Aurangabad | शहरात Raj Thackeray यांच्या विरोधात बॅनरबाजी, संघटनांची कोर्टात जाण्याची तयारी, औरंगाबाद मनसेची भूमिका काय?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबादः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेला आठ दिवस शिल्लक राहिले असताना ही सभा होऊ नये, यासाठी सात ते आठ संघटनांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. राज ठाकरेंच्या या सभेमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असे सांगत काही संघटना हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. मनसेचे (MNS leaders) नेते मात्र सभा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. दरम्यान, शहरातील काही भागात राज ठाकरे यांनी पूर्वी काढलेल्या व्यंगचित्राचे पोस्टर (Banners) उभे करण्यात आले. शिवसेनेचे नेते, आमदार, पदाधिकाऱ्यांनी ते सोशल मीडियावर शेअरदेखील केले. मात्र पोलिसांनी तत्काळ धाव घेत, काही भागातील पोस्टर्स काढून टाकले.

‘सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व’

राज ठाकरे यांनी पूर्वी काढलेल्या व्यंगचित्राचाच आधार घेत राज ठाकरेंविरोधात शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील अल्का टॉकिज परिसरातदेखील हेच बॅनर्स लावण्यात आले होते. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिराला विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज ठाकरेंना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे, असा टोलाही या बॅनर्सद्वारे लगावण्यात आला आहे.

औरंगाबाद मनसेतर्फेही वातावरणनिर्मिती

औरंगाबाद मनसेतर्फेही शहरात आणि सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या सभेसाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी काउंटडाऊन सुरु करण्यात आल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत.

आमचीही वकिलांची फौज तयार-मनसेचं उत्तर

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नये, यासाठी काही संघटना हायकोर्टात धाव घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र सभेविरोधात कुणी न्यायालयात गेले तरी आमच्याकडेदेखील वकिलांची फौज सज्ज आहे. आमचे वकील त्याला उत्तर देतील, असे मनसेचे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी सांगितले.

पोलिसांची परवानगी कधी मिळणार?

राज ठाकरे यांच्या सभेला अद्याप शहर पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेली नाही. मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

इतर बातम्या-

Exclusive: फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराजनंतर पुढे काय? अखेर मिळालं उत्तर

Micromax : मायक्रोमॅक्सचा ‘हा’ बजेटफोन लवकरच लाँच होणार, किंमत आणि फिचर्सबद्दल जाणून घ्या