Aurangabad | मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर, 3 जुलै रोजी औरंगाबादेत पुरस्कार वितरण सोहळा

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेले हे पुरस्कार येत्या 03 जुलै रोजी वितरीत करण्यात येतील.

Aurangabad | मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर, 3 जुलै रोजी औरंगाबादेत पुरस्कार वितरण सोहळा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 12, 2022 | 9:42 AM

रंगाबादः मराठवाड्यातील साहित्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी. साहित्य परिषदेच्या (Marathwada sahitya Parishad) वतीनं दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. विविध वाड्मय (Literature) प्रकारांतील उत्कृष्ट पुस्तकांना अथवा ग्रंथांना साहित्य परिषदेच्या वतीनं पुरस्कार दिले जातात. यंदाचे पुरस्कार जाहिर झाले असून संबंधित साहित्यिकांना लवकरच पुरस्कार देऊन त्यांना सन्मान केला जाईल. 2021 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांतून पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेले 2022 चे ग्रंथ पुरस्कार मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील (Kautikrao Thale Patil) यांनी जाहीर केले. येत्या 3 जुलै रोजी औरंगाबादेत या पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पुरस्काराचे मानकरी कोण?

  •  नरहर कुरुंदकर वाड्मय पुरस्कारः प्रा. अनिरुद्ध जाधव यांच्या ‘मनासी संवाद’ या आत्मचरित्राची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
  • प्राचार्य म. भि. चिटणीस वाड्मय पुरस्कारः या पुरस्कारासाठी डॉ. केदार काळवणे, कळंब यांच्या ‘कल आणि कस’ या समीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे.
  • कै. कुसुमताई देशमुख काव्यपुरस्कारः या पुरस्कारासाठी कविता मुरुमकर, सोलापूर यांच्या ‘उलवायचाय तुझा पाषाण’ या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली.
  • बी. रघुनाथ कथा/ कादंबरी पुरस्कारः यावर्षी रमेश रावळकर, औरंगाहाद यांच्या ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
  •  कुमार देशमुख नाट्य पुरस्कारः डॉ. सतीश साळुंके, बीड यांच्या ‘मराठवाड्यातील नाट्यपरंपरा’ या ग्रंथाला हा पुरस्कार मिळाला.
  • नरेंद्र मोहरीर वाड्मय पुरस्कारः प्रा. मिलिंद कसबे यांच्या ‘साहित्य आणि लोककलाः मार्क्स आंबेडकरी दिशा’ या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे.
  • रा.ज. देशमुख स्मृती पुरस्कारः या पुरस्कारासाठी नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचक चळवळीशी संबंधित अनोखे प्रयोग करणारे संचालक विनायक रानडे यांची निवड करण्यात आली आहे.

03 जुलै रोजी वितरण सोहळा

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेले हे पुरस्कार येत्या 03 जुलै रोजी वितरीत करण्यात येतील. प्रा. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने ही ग्रंथनिवड केली असून या समितीत कवी बालाजी इंगळे, प्रमोद माने आणि डॉ. सुरेंद्र पाटील हे सदस्य होते. रा.ज. देशमुख स्मृती पुरस्काराची निवड ज्येष्ठ प्रकाशक के.एस. अतकरे, डॉ. दादा गोरे आणि डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्या समितीने केली आहे.