जरांगेंसाठी चार तरुणांचं आमरण उपोषण, रास्तारोको, उद्या परभणी बंद; आंदोलक आक्रमक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी नांदेडमध्ये चार तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. परभणीत उद्या 'बंद'ची हाक दिली असून, धाराशिव, संभाजीनगर, जालना येथे मराठा समाज आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन करत आहे. सरकारने त्वरित मागण्या मान्य कराव्यात, अशी आंदोलकांची मागणी आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. आज पाचव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे यांच्या समर्थनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते अंतरवली सराटीत येत आहे. नांदेडमध्ये चार तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. तर परभणीत उद्या बंदची हाक देण्यात आली आहे. जरांगे यांचं आंदोलन चांगलंच पेटलं असून आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
चार तरुणांचे आमरण उपोषण
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषनाच्या समर्थनात नांदेडच्या भोकर तहसील समोर एका मराठा तरुणाने आमरण उपोषण सुरु केलंय. बालाजी पाटील कदम बटाळकर याने मागील चार दिवसापासून अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. आज त्यांची प्रकृती खालावलीय. याव्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यातील निवघा बाजार येथे जलकुंभावर बसून लक्ष्मण पाटील कदम आणि ओमप्रकाश पाटील कदम हे दोन तरुण आमरण उपोषण करत आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोपान नेव्हल पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे.
उद्या परभणी बंदची हाक
परभणीच्या पात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी आज जोरदार रास्ता रोको आंदोलन केलं. जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य करा, या मागणीसाठी मराठा समाज बांधवांचं मागील दीड तासापासून रास्ता रोको आंदोलन करत आहेत. आंदोलकांकडून उद्या परभणी जिल्हा बंदची हाकही देण्यात आली आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.
संभाजीनगरात आंदोलक आक्रमक
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या पैठण शहरात मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मराठा आंदोलकांनी पैठण शहरातल्या सह्याद्री नाका चौकात रास्ता रोको आंदोलन केलं. एक मराठा, लाख मराठाची घोषणाबाजी करत यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवला.
धाराशिवमध्ये टायर पेटवला
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिव–औसा रोडवरील चिखली फाटा येथे सकल मराठा बांधवांकडून टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
जालन्यातही रास्ता रोको
जालन्यातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरत जोरदार आंदोलन केलं. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण आहे.