एकाच घरातील 6 उमेदवार मैदानात, 3 जणांचा पराभव, कोणाचे नशीब फळफळले?

बदलापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या रुचिता घोरपडे यांनी शिवसेनेच्या विणा म्हात्रे यांचा ७४३३ मतांनी पराभव केला. वामन म्हात्रे यांच्या घरातील ६ पैकी ३ उमेदवारांचा पराभव झाला असून भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला सर केला आहे.

एकाच घरातील 6 उमेदवार मैदानात, 3 जणांचा पराभव, कोणाचे नशीब फळफळले?
maharashtra election
| Updated on: Dec 22, 2025 | 2:42 PM

राज्यातील २८६ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल काल २१ डिसेंबरला जाहीर झाला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निकालांमध्ये महायुतीने मोठे यश संपादन केले असले, तरी बदलापूरमध्ये मात्र शिवसेना शिंदे गटाच्या बालेकिल्ल्याला धक्का बसला. शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला होता. पण मतदारांनी या प्रयोगाला पूर्णपणे स्वीकारले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या म्हात्रे कुटुंबाच्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

मोठा राजकीय धक्का

या निवडणुकीत वामन म्हात्रे यांना सर्वात मोठा धक्का बसला. वामन म्हात्रे यांच्या पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विणा म्हात्रे यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. भाजपच्या रुचिता घोरपडे यांनी विणा म्हात्रे यांचा ७,४३३ मतांच्या फरकाने पराभव झाला. त्यांची बदलापूरच्या नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या बदलापूरमध्ये भाजपने पहिल्यांदाच नगराध्यक्षपदाचा झेंडा फडकवला. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातून ६ जण रिंगणात होते. त्यापैकी केवळ ५० टक्के उमेदवारांनाच यश मिळाले आहे. यात वामन म्हात्रे, त्यांचे भाऊ तुकाराम म्हात्रे आणि भावजय उषा म्हात्रे यांनी विजय संपादन करून आपली प्रतिष्ठा राखली. पण तरी कुटुंबातील नव्या पिढीला मतदारांनी नाकारले आहे. वामन म्हात्रे यांच्या पत्नी वीणा म्हात्रे, पुत्र वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांचा पराभव झाला. हा निकाल म्हणजे घराणेशाहीच्या विरोधात गेलेला कौल असल्याचे बोलले जात आहे.

नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपची बाजी

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर होती. मात्र, भाजपचे आमदार किसन कथोरे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली. बदलापूरमध्ये भाजपने आणि शिंदे सेनेने प्रत्येकी २३ जागांवर विजय मिळवला असला तरी नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. मतदारांनी एकाच घरात किती पदे? असा सवाल करत म्हात्रे कुटुंबाच्या वर्चस्वाला लगाम लावला आहे.

शिवसेनेच्या तिकीट वाटपामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी मतपेटीतून बाहेर पडली आहे. “कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलायच्या का?” हा विरोधकांनी लावलेला नारा मतदारांच्या मनात घर करून गेल्याचे निकालावरून स्पष्ट होते. या निकालामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि बदलापूरमधील राजकीय वर्चस्वाची पुन्हा बांधणी करावी लागणार आहे.