Baramati By Election : लक्ष्मण हाकेंचं ठरलं, बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवायची की नाही? निर्णय जाहीर
Baramati By Election : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. आज सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक लढवायची की नाही? या संदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे.

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्याची की नाही? या संदर्भात अखेर लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. “बारामतीमध्ये सहानुभूतीची लाट आहे. ही वस्तूस्थिती असताना सुद्धा काही प्रश्नांकडे मला लक्ष वेधून घ्यायचं होतं. मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. माझी कुठलीही राजकीय चाल नाही. मी एक ओबीसी आंदोलक असून भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी मी नेहमीच आवाज उठवतो. तशी मला स्पेस मिळाली आहे” असं लक्ष्मण हाके म्हणाले. “या निवडणुकीच्या निमित्ताने काही आक्रस्ताळेपणे, विद्रोही भावना काही गोष्टी आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करत होतो. भरणेमामांनी मला सांगितलं. महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांचे, सुनेत्राताई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विनंती केली. त्यापुढे उदय सामंत, धनंजय मुंडे या सर्वांनी मला कॉल केले. त्यानंतर मी विचार केला” असं लक्ष्मण हाके म्हणाले.
“माझी लढाई का आहे? मागच्यावर्षात सुद्धा माझे काही प्रश्न मार्गी लागले नाहीत. आमची चळवळीची भूमिका यापुढेही सुरु राहिलं. मी दादांना डोळ्यासमोर ठेऊन आक्रमकपणे भूमिका मांडत होतो. संघर्ष करताना कधी काळजी केली नाही. प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. ओबीसींच्या अनेक मागण्या आहेत. निवडणुकीआधी सरकारने 18 महामंडळं घोषित केली होती. पण त्या महामंडळांना अजून अध्यक्ष, कार्यालय मिळालेलं नाही” याकडे लक्ष्मण हाके यांनी लक्ष वेधलं.
सुनेत्राताईंचा फोन आला
“अनेक मुद्यांवर आक्रमकपणे भूमिका मांडली. या सर्व गोष्टी असताना सुनेत्राताईंचा फोन आला. एवढी सगळी मंडळी कॉल करत असताना आपण विचार केला पाहिजे. म्हणून माघार घेतली” असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. ते बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार नाहीत.
तुमच्या विश्वासहर्तेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का?
तुमच्या विश्वासहर्तेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का? त्यावर हाके म्हणाले की, “ज्यावेळी माणूस प्रामाणिकपणे काम करतो. कर नाही त्याला डर कशाला. मी विद्रोहाची भूमिका घेत असताना समाजातील शेवटच्या घटकासाठी आवाज उठवताना या गोष्टींना सामोर जावं लागतं”
त्यावर मी आजही ठाम आहे
“माझी जी भूमिका आहे, त्यावर मी आजही ठाम आहे. माझा अनुभव समाधानकारक नाही. ही निवडणूक झाल्यावर मी थांबणार नाही. सुनेत्राताई, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री यांच्यासमोर प्रश्न मांडत राहणार. काही आंदोलन यशस्वी झाली. काहींचे रिझल्ट मिळाले. निवडणूक 10-15 दिवसांची आहे. पुढचा कालावधी प्रश्न मांडण्यासाठी आहे” असं लक्ष्मण हाके म्हणाले. लक्ष्मण हाके यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवू नये यासाठी मंत्री दतात्रय भरणे यांनी त्यांची भेट घेऊन समजून काढली.