
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता तीन महिने होतील. पण याप्रकरणात काही आरोपींची धरपकड वगळता, इतर प्रक्रिया संथावल्याचे दिसते. त्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. तर अजून सहा मागण्यांचे गुर्हाळ सुटलेले नाही. त्यातच अजून ही बातमी समोर आली आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे याने सर्वांच्याच नाकात दम आणला आहे. त्याचा फटका दस्तूरखुद्द भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांना बसला आहे.
कृष्णा आंधळेंमुळे अण्णांची फसवणूक
9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर सर्वच आरोपी फरार झाले. त्यातील सर्वच आरोपी पुण्यातून अटक करण्यात आले. तर कृष्णा आंधळे मात्र फरार आहे. त्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभं केलं आहे. त्यातच कृष्णा आंधळे हा छत्रपती संभाजीनगरमध्ये लपल्याचा सुगावा लागला.
कृष्णा आंधळेला पकडून देण्याच्या बहाण्याने एकाने सुरेश धस यांची पाच हजारांची फसवणूक केली. स्वतः सुरेश धस यांनी मस्साजोग येथे भेटीदरम्यान हा किस्सा सांगितला. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचीही त्याच व्यक्तीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली.
दोघांनी सांगितला फसवणुकीचा प्रकार
सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांनी काल मस्साजोगमध्ये ग्रामस्थांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना फसवणुकीच प्रकार सांगितला. कृष्णा आंधळे कुठे लपला आहे, हे सांगण्याच्या बाहण्याने संबंधित व्यक्तीने सुरेश धस यांच्याकडून पाच हजार रुपये उकळले. तर बजरंग बप्पा यांना फोन करून आरोपी कृष्णा आंधळे हा संभाजीनगरमध्ये असल्याचे त्याने सांगितले. पण नंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हा सर्व प्रकार पोलीस अधिक्षकांना सांगितला.
चार तास पाहिली वाट
बापूराव बारगजे या व्यक्तीने आमदार सुरेश धस यांना फोन केला होता. कृष्णा आंधळे येथे आहे. त्याला तुमच्याकडे घेऊन येतो. पण कॅबसाठी पाच हजार रुपये तेवढे द्या अशी विनंती बारगजे यांनी केली. धस यांनी बारगजेला पाच हजार रुपये पाठवले. ते त्याची नगरमध्ये वाट पाहत थांबले. हॉटेल यश येथे आष्टीचे पोलीसही त्यांच्यासोबत होते. पण हा बारगजे काही आलाच नाही. तो माणूस फ्रॉड निघाला, असे धस म्हणाले.