उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंग कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंग कोश्यारी यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे. पी विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंग कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री (Ex CM Uttarakhand) भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी (Maharashtra Governor) नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासोबतच राजस्थान (Rajasthan), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), केरळ (Kerala) आणि तामिळनाडू (Tamilnadu) या चार राज्यांनाही नवे राज्यपाल मिळाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी शनिवारी यासंदर्भात घोषणा केली.

राज्याचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यामुळे भगत सिंग कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 30 ऑगस्ट 2004 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झालेल्या राव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला.

कोण आहेत भगत सिंग कोश्यारी?

भगत सिंग कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत. आणीबाणीच्या काळात 1977 मध्ये त्यांनी तुरुंगवारीही भोगली आहे.

उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2001-2002 या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 या काळात उत्तराखंड विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी त्यांची वर्णी लागली होती. 2008 ते 2014 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते.

77 वर्षीय भगत सिंग कोश्यारी यांनी इंग्रजी साहित्य विषयात पदवी संपादन केली आहे. व्यवसायाने ते शिक्षक आणि पत्रकारही होते.

दरम्यान, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कलराज मिश्र यांची राजस्थानच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली आहे. तर हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी बंडारु दत्तात्रेय यांची वर्णी लागली आहे. केरळच्या राज्यपालपदी आरिफ मोहमद खान, तर तामिळनाडूच्या राज्यपालपदी तामिलीसाई सुंदर राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपालांकडे कोणती जबाबदारी?

भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालांच्या हाती असतो. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे होते. राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचं काम राज्यपाल पाहतो.

राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक

1. ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी
2. त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत

राज्यपालांचा कार्यकाळ

सर्वसाधारणपणे राज्यपालांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करु शकतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *