
महाराष्ट्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपने ७० टक्क्यांहून अधिक जागा जिंकून महायुतीचे वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त ९ जागा मिळाल्या आहेत. तर राज ठाकरे यांच्या मनसेला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर आता सर्वांचे लक्ष मुंबई महानगरपालिकेसह (BMC) राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे लागले आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करणं हे ठाकरे बंधूंसाठी फारच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ही महापालिका निवडणूक करो या मरोसारखी असणार आहे.
गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत ठाकरे कुटुंबाची सत्ता आहे. ही सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी २० वर्षांचे राजकीय वैर बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी शिवसेना ठाकरे गट १५० हून अधिक जागांवर लढणार असल्याचे बोललं जात आहे. तर मनसे ६० ते ७० जागांवर लढण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक आणि इतर काही शहरांतील जागावाटपावरून अद्याप पेच कायम आहे. त्यामुळे युतीची घोषणा लांबणीवर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार मंगळवारी २४ डिसेंबरपासून अधिसूचना जारी होऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. इच्छुक उमेदवारांना आपले नामांकन अर्ज ३० डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल करता येतील, ज्याची छाननी ३१ डिसेंबर रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. त्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. यानंतर अखेर १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २८६९ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी लागणाऱ्या निकालातून राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा आणि ठाकरे ब्रँडचे भवितव्य स्पष्ट होईल.
तर दुसरीकडे भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत मित्रत्वप्रमाणे भूमिका घेऊन राजकीय रणनीती आखली जात आहे. तसेच संजय राऊत हे काँग्रेसला महाविकास आघाडीत टिकवून ठेवण्यासाठी राहुल गांधींशी संवाद साधत आहेत. मात्र, मनसेची आक्रमक भूमिका आणि काँग्रेसची विचारसरणी यात ताळमेळ बसवणे हे संजय राऊत यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे.
मुंबई महापालिकेचे वार्षिक बजेट ७४,४२७ कोटी रुपयांहून अधिक आहे, जे अनेक छोट्या राज्यांच्या बजेटपेक्षाही मोठे आहे. ही आर्थिक आणि राजकीय शक्ती गमावणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा तोटा असणार आहे. भाजपने मुंबईत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहेत. त्यामुळे सध्या ठाकरे बंधू मराठी माणूस, भाषा या मुद्द्यांवरुन मतदारांना पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधूंकडून ठाकरे वारसा वाचवण्यासाठी युतीचा प्रयत्न केला जात आहे.