Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या दुष्काळ दौऱ्यात शेतकरी नाराज, बिचारे सकाळपासून थांबलेले पण शिंदे..
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या दुष्काळ दौऱ्यात शेतकरी नाराज झाल्याचे समोर आलं. शेतकरी बिचारे सकाळपासून थांबलेले होते, पण ऐनवेेळी शिंदे न आल्याने शेतकरी नाराज झाले.

महाराष्ट्रात पावसाचा खंड पडल्याने दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी दुष्काळाची पाहणी सुरू केली होती. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी देखील दुष्काळ दौरे सुरू केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालपासून दुष्काळ पाहणी दौरे सुरू केले आहेत. फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रभरात दौरे सुरू केले. शिंदे काल बुलढाण्यातील दौऱ्यावर होते. परंतु शिंदे काही गावात न पोहोचल्याने शेतकरी नाराज झाल्याचे समोर आलं आहे. सकाळपासून वाट पाहिल्यानंतरही उपमुख्यमंत्री शिंदे न आल्याने शेतकऱ्यांचा एकच हिरमोड आणि संताप पाहायला मिळाला. तर काही गावात एकनाथ शिंदे हे तब्बल अडीच ते तीन तास उशिरा आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शिंदे जिल्ह्यातील दुष्काळी भागात जाऊन पाहणी करणार होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांशी संवाद साधणार होते. मात्र शिंदे ठरलेले दौऱ्याचे वेळेवर न येता तब्बल अडीच ते तीन तास उशिरा आले. शिंदे यांचा खामगाव तालुक्यातील कोलोरी आणि मोताळा तालुक्यातील चार गावात दुष्काळी पाहणी दौरा होता. मात्र उशीर आल्याने शिंदे यांनी खडकी, रोहीणखेड आणि टाकळी येथे दौरा केला, तर तिघ्रा गावात त्यांना उशीर झाल्याने पोहचता आले नाही. परिणामी सकाळपासून एकनाथ शिंदे यांची वाट पाहत असलेले शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आणि संताप ही पाहायला मिळाला. तर ज्या गावात शिंदे गेले, तेथील शिंदेंनी शेतकऱ्यांच्या सोबत संवाद ही साधला आणि त्यांना मदतीचे आश्वासन ही दिले.
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यावर शिंदे काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर शिंदे म्हणाले, ‘ शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये, सरकार तुमच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांची दिवाळी दसरा अंधारात जाऊ देणार नाही. आमदार संजय गायकवाड यांनी पगार दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीसाठी दिला आहे’. त्यानंतर इतर मंत्री आणि आमदार पगार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याचे पण उत्तर देऊ. शेतकऱ्यांना पुरेपूर मदत करू. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. लवकरच दुष्काळ संदर्भात घोषणा करू, असेही शिंदे यांनी सांगितले.
