मध्य रेल्वेच्या सेवेचा पुरता बोजवारा, सकाळी झालेल्या बिघाडाचा रात्रीही परिणाम, ठाणे स्थानकात चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती
सकाळच्या बिघाडानंतरही रात्री मध्य रेल्वेच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून जलद लोकल ३५ मिनिटे, तर धीम्या गतीची लोकल पाऊण ते एक तास उशिराने धावत आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सोमवारी सकाळी दोन लागोपाठ झालेल्या बिघाडाने लोकल सेवा विस्कळीत झाली होती. या तांत्रिक बिघाडाने मध्य रेल्वेच्या चाकरमान्याचे प्रचंड हाल झाले. सकाळी लोकलच्या रांगा लागल्याने प्रवाशांना रेल्वे रुळात उतरुन नजिकचे स्थानक गाठत प्रवास करावा लागला. सायंकाळी देखील लोकलच्या एकामागोमाग रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
पहिला बिघाड सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान कांजूरमार्ग येथील सिग्नल यंत्रणेत आग लागल्याने घडला. येथे सिग्नल बिघाडाने विक्रोळी ते भांडुप येथील सिग्नल ब्लँक झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. यामुळे एकामागोमाग लोकलच्या रांगा लागल्या. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला.त्यानंतर ठाणे आणि मुलुंड स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायरवर वायरीचा तुकडा पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी दहा वाजताच्या सुमारास झालेला हा बिघाड दुरुस्त करण्यास १०.५८ वाजले. लागोपाठ झालेल्या दोन बिघाडाने मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचा पुरता बोजवारा उडाला.
ठाणे स्थानकावर चेंगराचेंगरीची स्थिती
सायंकाळी ठाणे स्थानकावर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. सायंकाळी ठाणे स्थानकात इतकी गर्दी झाली की मुंगी शिरायला जागा नव्हती. या ठिकाणी ट्रान्स हार्बर मार्गा आणि मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग एकत्र येत असल्याने या ठिकाणी एरव्ही देखील प्रचंड गर्दी असते. आज तांत्रिक बिघाडाने लोकल ट्रेन उशीरा धावत असल्याने गर्दीत दुप्पट वाढ झाल्याचे चित्र होते. सायंकाळी मध्य रेल्वेवरील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून जलद लोकल ३५ मिनिटे, तर धीम्या गतीची लोकल पाऊण ते एक तास उशिराने धावत आहेत.
कामावरून सायंकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांची ठाणे स्थानकात अलोट गर्दी जमली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर तुफान गर्दी झाली आहे.लोकल स्थानकात येतातच चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये तुफान चेंगराचेंगरी होऊन काही प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडत असल्याचे भीतीदायक चित्र आहे. रेल्वे प्रशासनाकडून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून गाड्यांचे वेळापत्रक सुधारण्याचे काम सुरू आहे.चाकरमान्यांचे हाल थांबवण्यासाठी ठाण्यावरून कल्याणसाठी तातडीने विशेष (Special) लोकल चालवावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे.