पुण्याच्या 2 जागा जिंकण्यासाठी भाजपची तगडी फिल्डिंग! खुद्द फडणवीस सगळा रिपोर्ट ठेवणार; नेमका प्लॅन काय?
Devendra Fadnavis On Pune Election: पुणे शिक्षक-पदवीधरच्या दोन जागा जिंकण्यासाठी भाजपने मास्टरप्लॅन तयार केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी नेत्यांना स्पष्ट आदेश दिले आहे.

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या दोन्ही जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. दोन्ही मतदारसंघांत 80 टक्के मतदान झाले पाहिजे, तसेच जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी उपलब्ध राहावे, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीतील कामकाजाचा आणि तयारीचा रिपोर्ट आपण स्वतः घेणार असल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुका महायुतीसाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळे मतदारांशी संपर्क वाढवणे, मतदानाची टक्केवारी उंचावणे आणि संघटनात्मक पातळीवर समन्वय राखणे यावर भाजपने भर दिला आहे. दोन्ही जागांवर विजय मिळवायचा असेल, तर सर्वांनी सक्रियपणे कामाला लागले पाहिजे, असा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीतून दिला आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून कौस्तुभ गावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, मी महायुतीचा उमेदवार आहे. आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत, असे गावडे यांनी सांगितले. मात्र महायुतीतील तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेणे अद्याप बाकी असल्याचेही कौस्तुभ गावडेंनी स्पष्ट केले आहे.
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार का, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना गावडे यांनी आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. आपल्या बॅनरवर तिन्ही नेत्यांचे फोटो असल्याचे नमूद करत आपण महायुतीच्या माध्यमातूनच मैदानात असल्याचेही गावडे यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपची तयारी, महायुतीतील समन्वय आणि उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय याकडे आता लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशांनुसार मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पक्षाच्या स्थानिक यंत्रणेसमोर असणार आहे. दोन्ही जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी महायुती कोणती रणनीती आखते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.