एकनाथ शिंदेंचा काँग्रेसच्या विरोधात मोठा डाव; बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, राजकारण फिरलं
एकनाथ शिंदेंनी काँग्रेसच्या विरोधात मोठा डाव टाकला. त्यानंतर बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांची शिवसेनेत धाव घेतली. यामुळे परंडामधील राजकारण फिरलं आहे.

श्रीराम क्षीरसागर : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धाराशिवच्या परंडा तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याने परंडामध्ये काँग्रेसला मोठा हादरा दिला आहे. काँग्रेस तालुकाध्यक्ष अॅड. हनुमंत वाघमोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. वाघमोडे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाने परंडामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या राजकीय खेळीने परंडामधील राजकारण फिरल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसच्या तालुका पातळीवरच्या बड्याने नेत्याने शिंदे गटात प्रवेश केल्याने परंडामध्ये राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे आमदार, माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर आणि विकासात्मक भूमिकेवर पूर्ण विश्वास ठेवून परंडा माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲड. हनुमंत वाघमोडे यांनी आपल्या शेकडो प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय. अलीकडेच लंडन दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे यांचं नेतृत्व सर्वसमावेशक असल्याचे म्हणत परंडा तालुक्यातील काँग्रेस पक्षाची यंत्रणा शिंदे गटात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या पक्षप्रवेशामुळे परंडा तालुक्यातील शिवसेना संघटना अधिक तळागाळापर्यंत बळकट होणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.
कोणी केला शिंदे गटात प्रवेश?
परंडा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष उत्तरेश्वर ठवरे, हनुमंत करळे (नालगाव), कोषाध्यक्ष, लक्ष्मण खरातोडे तालुका सरचिटणीस, नारायण साबळे (डोमगाव), पांडुरंग चोबे, तालुका सेक्रेटरी संदिप ठवरे, युनुस शेख (कंदलगाव), दादासाहेब आलदर, दत्तात्रय खांडकेर, विधी सेल तालुकाध्यक्ष अवधूत पाटील, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अन्वर शेख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष महावीर इतापे, सेवादल तालुकाध्यक्ष बालाजी गवारे, भैरवनाथ यादव यांच्यासह ढगपिंपरी, डोमगाव, पिंपळवाडी, वाकडी, वडनेर, मुगाव, डोंजा, वागेगव्हाण, शिराळा, हिंगणगाव आदी गावांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी उपस्थित नेत्यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भगवे उपरणे घालून शिवसेना परिवारात स्वागत केले.