पोलीस आयुक्तांसह मंत्री उदय सामंत यांच्या अकाऊंटवरही सायबर हल्ल्याने खळबळ
ठाणे पोलिसांचा मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झाल्याच्या संदर्भात हॅकिंगबाबत बोलताना उदय सामंत यांनीही आपला मोबाईल, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे.

ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल कोणीतरी हॅक केल्याचे वृत्त ताजे असतानाच आता उद्याग मंत्री उदय सामंत यांनी आपले हॅकींग संदर्भात बोलताना त्यांचे मोबाईल, फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे.सायबर क्राईम करणारे आता इतके निर्ढावलेले आहेत की ते पोलिस आणि मंत्र्यांची सोशल अकाऊंट हॅक करण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल फोन हॅक करुन त्यांच्या व्हॉट्सअपवर अश्लिल स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र, या संदर्भात आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही अशाच प्रकारचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले आहे. ठाणे पोलिसांचा मोबाईल हॅक झाल्याच्या संदर्भात बोलताना उदय सामंत यांनीही आपला मोबाईल, फेसबुक आणि ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे.
वाढते तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेले सायबर हॅकर्स यामुळे अशा घटना घडत असाव्यात पोलीससुद्धा माणूसच आहेत. त्यांच्याकडे कोणतीही वेगळी शक्ती नाही. त्यामुळे त्यांचाही मोबाईल हॅक झाला असावा असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. सायबर हॅकर्सच्या माध्यमातून उदय सामंत यांनाही कोणालातरी ३ हजार ५०० रुपये द्यावे लागल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर मंगळवारी सायंकाळी ४.४६ वाजताच्या सुमारास अचानक अश्लील व्हिडीओ दिसू लागले.अवघ्या काही मिनिटांत त्यांच्या खात्यावरून सुमारे १५ ते २० आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप्स स्टेटसवर प्रसारित करण्यात आल्या.त्यानंतर पोलिस खात्यात खळबळ उडाली. हा प्रकार इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. सुमारे ५० मिनिटे ते एक तास आक्षेपार्ह व्हिडीओ त्यांच्या स्टेटसवर होते आणि सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संबंधित व्हॉट्सॲप खाते बंद करून सर्व व्हिडीओ डिलीट करण्यात पोलिसांना यश आले.