मोठी बातमी! दादर रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी होणार, देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा; अधिवेशनातच…

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मोठी बातमी! दादर रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी होणार, देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा; अधिवेशनातच...
dadar railway station name
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 6:51 PM

Dadar Railway Station Name Change : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका आणि भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौध्द भिख्खू संघ, आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे

महापरिनिर्वाण दिनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मागील वर्षांच्या अनुभवातून निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

Loading...

महापरिनिर्वाण दिनाच्या आयोजनात समन्वय समिती, बौद्ध संघटना आणि विविध संस्थांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्थांची जबाबदारी पार पाडण्यात येत असली तरी या उपक्रमाच्या प्रभावी आयोजनासाठी सर्व संबंधित घटकांचा समन्वय आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, प्रशासकीय विभाग तसेच अन्य संबंधित यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. यंदाही प्रत्येक विभागाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात.

महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना त्रास होऊ नये, यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलनांना अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चैत्यभूमी आणि परिसरात शांततापूर्ण, शिस्तबद्ध व श्रद्धापूर्वक वातावरण कायम राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनात ऑटोरिक्षांना प्रवेशाची मर्यादा, भाविकांच्या पुढील प्रवासाची सुविधा आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी पूर्वनियोजित व्यवस्था असावी. रेल्वे, रस्ते वाहतूक, स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलीस यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून अनुयायांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीत कुठे अडचण आहे, याची तपासणी करून पुढील पाच ते सात दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य व पावित्र्य कायम राखणे आवश्यक असून, या दिवशी उत्सवी स्वरूपाचे आयोजन टाळण्यात यावे. हा दिवस दुःखाचा असल्याने उत्सवी स्वरूपाच्या कार्यक्रमाऐवजी अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट अथवा त्यांच्या विचारांशी सुसंगत अन्य उपक्रम आयोजित करता येतील का, याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

इंदू मिल येथील स्मारकाच्या कामासाठी वाढीव निधी कमी पडू देणार नाही

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास शासन तयार असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दादर स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात

दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर स्थानकाचे नामकरण करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

बैठकीत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांची नोंद घेण्यात आली असून, अनुयायांच्या सुविधा, सुरक्षितता आणि सुव्यवस्थित नियोजनासाठी शक्य त्या सर्व बाबींवर कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस असून, देशभरातून येणाऱ्या अनुयायांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. सर्व विभागांच्या समन्वित प्रयत्नांतून यंदाचा महापरिनिर्वाण दिन शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अनुयायांना सर्व सुविधा देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नसल्याची ग्वाही दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या लाखो अनुयायांना सुविधा देण्यासाठी शासन पूर्णपणे तयारी करत आहे. मुंबई महानगरपालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर विकास विभाग आणि अन्य संबंधित विभागांनी एकत्रितपणे केलेल्या नियोजनातून दरवर्षी व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. समन्वय समिती व विविध संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.

अनुयायांच्या निवास, विश्रांती आणि भोजनाच्या सुविधांसाठी मोठे मंडप तसेच जर्मन हँगर उभारण्यात येतात. यामध्ये अधिकाधिक भाविकांना थांबता यावे, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन, वाहतूक, पोलीस बंदोबस्त आणि रेल्वे सेवांच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील प्रवेश करताना महामार्गावरील टोल यापूर्वीच बंद करण्यात आला असून, महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या वाहनांना टोल सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

अनुयायांच्या सुविधा व सुरक्षिततेस प्राधान्य – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी देशभरातून आणि राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात यावे, असे सांगितले. चैत्यभूमी परिसरासह मुंबईत येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात. सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी सतर्क राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रशासनाने सज्ज राहून नागरिकांच्या सुविधा आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत विविध सूचना मांडल्या. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ७० वा महापरिनिर्वाण दिन असून, ५ व ६ डिसेंबरला चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात भाविकांची संख्या सुमारे १५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने उपलब्ध सुविधा वाढविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us