सांग कुठं ठेवू माथा, कळनाच काही: मंदिर प्रवेशावरून वादाचे मोहोळ; त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहात भाविकांना बंदी

| Updated on: Oct 10, 2021 | 12:37 PM

नेहमीच कुठल्या ना कुठल्या घटनेने चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. आता त्र्यंबकेश्वर मंदिरच्या गर्भगृहात पुरोहितांसह भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे.

सांग कुठं ठेवू माथा, कळनाच काही: मंदिर प्रवेशावरून वादाचे मोहोळ; त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहात भाविकांना बंदी
त्र्यंबकेश्वरचे मंदिर.
Follow us on

नाशिकः नेहमीच कुठल्या ना कुठल्या घटनेने चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. आता त्र्यंबकेश्वर मंदिरच्या गर्भगृहात पुरोहितांसह भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ही त्र्यंबकेश्वरची खाती. इथल्या भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हजेरी लावतात. मात्र, त्यांना गर्भगृहात प्रवेशबंदी असल्याने त्यांचा हिरमोड होणार आहे. विशेष म्हणजे देवस्थान ट्रस्टच्या निर्णयाने पुन्हा एकदा वादाचे मोहोळ उठले आहे. त्याचे झाले असे की, ट्रस्टने सुरुवातीला भाविकांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश देण्यासाठी बंदी घातली. त्यासाठी शिवलिंगावर भाविक पाणी टाकतात. त्यामुळे शिवलिंगाची झीज होते. हे कारण देण्यात आले. या निर्णयानंतर साधू-महंत दर्शनासाठी मंदिरात गेले. तेव्हा त्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला. शिवाय फक्त पुरोहितांनाच मंदिरात प्रवेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे साहजिकच साधू-महंतांचा संताप अनावर झाला. त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. हे प्रकरण अंगावर शेकणार असे वाटताच, ट्रस्टने लगेच आपला निर्णय बदलला आणि गर्भगृहातील प्रवेशासाठी पुरोहितांवरही बंदी घालत फक्त त्रिकाल पूजक आणि तुंगारांना सूट दिली. या निर्णयावरही भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नेमका देव कुणासाठी, भाविकांसाठी की ट्रस्टसाठी असा सवाल करण्यात येत आहे.

यापूर्वीही ट्रस्ट वादात

त्र्यंबकेश्वर देवस्थानची जागा प्रशासनाने कोरोनाकाळातील सेवेसाठी अधिग्रहित केली होती. या जागेच्या भाड्यापोटी देवस्थान ट्रस्टने प्रशासनाकडे तब्बल 99 लाख 63 हजार रुपये इतक्या रकमेची मागणी गेल्याच महिन्यात केली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने देवस्थानला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे खरमरीत पत्र लिहून कान टोचले होते. त्या पत्रात म्हटले होते की, आपल्या संस्थानाची नोंद सार्वजनिक न्यास स्वरूपाच्या सेवाभावी संस्थानात आहे. त्यामुळे अशा संस्थानाने शासनाच्या मोफत उपचाराच्या प्रयत्नास सहकार्य करणे आवश्यक होते. तथापि, असे न करता आपण अनाकलनीय व कोणताही खुलासा नसलेली पैशांची मागणी केली आहे. आपली ही मागणी योग्य नाही, अशा शब्दांत त्र्यंबक देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना उपदेशाचे बोधामृत पाजले आहे. शिवाय प्रशासनाने संस्थानला विस्तृत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही देवस्थानने ट्रस्टने काही बोध घेतलेला दिसत नसल्याचेच दिसते.

पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी

एकीकडे राज्यातील अनेक दानशूर संस्था, मंदिरे कोरोना काळात सरकारच्या मदतीसाठे पुढे आली. इतकेच नाही तर गावखेड्यातील आणि शहरातील अगदी छोट्या-छोट्या मंडळांनी मदतीसाठी खारीचा वाटा उचलला. अशा भयान संकटात दिलेल्या जागेच भाडे मागणे अतिशय अयोग्य प्रकार आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये पडलेले असताना असा क्षुद्रपणा दाखविणे योग्य नाही. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी देवस्थानच्या माजी विश्वस्तांनी यापूर्वी केली होती. आता या नव्या निर्णयानंतर माजी विश्वस्त काय भूमिका घेणार, याकडे भाविकांचे लक्ष आहे.

इतर बातम्याः

लचकंतोड्या पावसाने झोडपले, ढगफुटीसारखी हजेरी; नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांसह पिकांचे क्षणात होत्याचे नव्हते!

नाशिकमध्ये पहिल्यांदाच UPSC परीक्षा; आज 3445 विद्यार्थी भविष्य आजमावणार