उद्धव ठाकरे हे चादर चढवणारे आहेत आणि त्यांना मतदान करणारे… नवनीत राणांची विखारी टीका
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला अखेर दुजोरा मिळाला. तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

“दोन भाऊ एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये त्यांचा शेवट नंबर लागत आहे. ज्यांचा पक्ष मुख्यमंत्री बनण्याची ताकद ठेवत होता तो आता शेवटी आहे” अशी टीका माजी खासदार नवनीत राणा यांनी केली. “जनाब उद्धव ठाकरे व राज ठाकरेंना एकच प्रश्न आहे की, दोघांच्या भेटीच्या आधी राज ठाकरेंचा नारा असायचा की माझ्या हिंदू बांधवांनो, बहिणींनो,मात्र आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना भेटल्यावर आता मात्र महाराष्ट्राचे माझे सर्व मतदार असं बोलत आहेत. या दोन गोष्टींमध्ये मोठा अंतर आहे” असं नवनीत राणा म्हणाल्या.
“राज ठाकरे यांना मी विचारते की, उद्धव ठाकरे हे चादर चढवणारे आहेत आणि त्यांना मतदान करणारे चादर चढवून घेणारे आहेत. मग आता राज ठाकरेंचे भोंगे कुठे गेले? मशिदी कुठे गेल्या? हनुमान चालीसा कुठे गेली?” असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळेस उद्धव ठाकरे व त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांची सर्व दुकानदारी बंद होणार आहे. महानगरपालिकेत झेंडा आता फक्त भाजपचा आणि भगवाच लागेल असं नवनीत राणा यांनी ठणकावून सांगितलं.
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला अखेर दुजोरा मिळाला. तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कल परिसरात शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडून आणि ढोल-ताशांच्या गजरात नाचून जल्लोष साजरा केला. “ठाकरे बंधू एकत्र” अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून गेला.
ठाण्यात फटाके वाजवत दिवाळी
ठाण्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयाबाहेर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन युतीची घोषणा करणार आहेत. त्याआधी ठाण्यात फटाके वाजवत दिवाळी साजरी केली. उत्साहाचे वातावरण ठाण्यामध्ये दिसून येत आहे.
