ऑक्सिजन निर्मिती करणारा देशातील पहिला साखर कारखाना, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्धाटन

राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत आहोत. अशावेळी साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलंय.

ऑक्सिजन निर्मिती करणारा देशातील पहिला साखर कारखाना, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्धाटन
धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्स्जिन प्रकल्पाचे उद्घाटन

उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. अशावेळी राज्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासतोय. त्यामुळे राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत आहोत. अशावेळी साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांनी आज उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे दूरदृश्य प्रणालीव्दारे उदघाटन केलं. (Dharashiv Sugar, India’s first sugar factory who set up an oxygen production plant)

या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते विकास आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील व्हीसीव्दारे सहभागी झाले. यावेळी कारखाना स्थळावर खासदार ओमराजे निबांळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील, कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे

कोरोनाविरुद्धचा पहिला लढा तर आपण जिंकला आहे. पहिल्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टींग लॅब उभारल्या, कोविड केअर सेंटर उभारले, बेडची क्षमता वाढवली. पण दुसऱ्या लाटेचं आव्हान मोठं आहे. मात्र आता राज्याच्या विविध भागातून येणारे अहवाल पाहिले तर या लाटेवरही आपण मात करू शकू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. पण त्यासाठी आपण ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे. आपल्या राज्यात बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होतो. आपली गरज साधारणतः सतराशे मेट्रिक टन आहे. पण आपल्याला तीन हजार मेट्रिक टन निर्मिती करायची आहे. तरच आपण स्वावलंबी होऊ शकू, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील विविध महानगरपालिकांना ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता सहकार, उद्योग क्षेत्राने यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करुन विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्वाचा आहे. यापासून इतर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांनी प्रेरणा घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलंय.

गडकरी आणि अजितदादांच्या महत्वाच्या सूचना

ऑक्सिजन निर्मितीसाठी डिस्टलरी बंद केली जाऊ नये. पन्नासहून आधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा. प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या जिल्ह्यातच निर्माण होईल, यावर भर द्यावा, अशी सूचना यावेळी नितीन गडकरी यांनी केली. तर धाराशिव कारखान्याने उभारलेला प्रकल्प या संकटात अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील गरज पूर्ण होईल. त्याचबरोबर इतर काही जिल्ह्यात पुरवठा केला जाऊ शकतो. इतर कारखान्यांनीही अशा प्रकारे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी आणि नियमावलीत बदल करण्याबाबत संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी. यामुळे ऑक्सिजन निर्मिती करण्याची प्रक्रिया आधिक गतिमान होईल, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री शंकरराव गडाख यांनीही मनोगत व्यक्त केलं. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन विकसित करण्यात आलेल्या आरटीपीसीआर प्रयोग शाळेबाबत माहिती दिली. तर आमदार कैलास पाटील यांनी आभार मानले.

प्रकल्पाबाबत थोडक्यात

>> उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पात बदल करुन ऑक्सिजन प्रकल्पात रुपांतर
>> ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला साखर कारखाना
>> दररोज सहा टन ऑक्सिजनची निर्मिती होणार
>> ऑक्सिजनची शुद्धता 96 टक्के

संबंधित बातम्या :

VIDEO: जयंत पाटील शांत स्वभावाचे, मीच तापट; कुंटे-पाटील वादात तथ्य नाही: अजित पवार

VIDEO | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…

Dharashiv Sugar, India’s first sugar factory who set up an oxygen production plant

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI