दूध भेसळ प्रकरणावरून दिलीप वळसे पाटील आक्रमक; बदनामी करणाऱ्यांविरोधात 100 कोटींचा दावा ठोकणार
पुण्यातील दूध भेसळ प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी विरोधकांवर पलटवार केलाय. दूध भेसळ प्रकरणाशी आपला काडीचाही संबंध नसल्याचे सांगत बदनामी करणाऱ्यांविरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले आहे.

सुनिल थिगळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे : पुण्यात दूध भेसळ प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. दूध भेसळप्रकरणात माझा काडीचाही संबंध नसून मला बदनाम केलं जातंय, असं म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी आपली बदनामी करणाऱ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा दिवाणी आणि फौजदारी अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईचे पहिल्या दिवसापासून समर्थन करत असल्याचे सांगत, आपण कोणालाही पाठीशी घालत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचेही त्यांनी स्वागत केले आहे. ते आंबेगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
दिलीप वळसे पाटील यांनी दूध भेसळ प्रकरणावरून आपली भूमिका स्पष्ट केली. 1990 पासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असून सार्वजनिक जीवनात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा किंवा त्याला पाठिंबा दिल्याचा एकही आरोप झालेला नसल्याचं त्यांनी म्हटलं. दूध भेसळ प्रकरणाशी संबंध जोडून आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ‘आका’ आणि ‘मास्टर माईंड’ अशा उल्लेखातून बदनामी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
“दोषींना शिक्षा झाली पाहीजे…”
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवर अन्न व औषध प्रशासनाने गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक आणि जामीन झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. दोषींना शिक्षा झाली पाहिजे, ही आपली भूमिका कायम असल्याचं सांगत वळसे पाटील यांनी संबंधितांविरोधात कायदेशीर नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.
कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिली
या प्रकरणी आपली कायदेशीर बाजू मांडण्यासाठी नामवंत विधिज्ञांची मदत घेतली असून, संबंधितांविरोधात दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. ‘संबंधितांना लवकरच कायदेशीर नोटिसा प्राप्त होतील. त्यानंतर न्यायालयीन पातळीवर या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
