चर्चा विलिनीकरणाची पण खरा गेम हा.. अमित शाह पुण्यात असताना शिंदे सेनेच्या मंत्र्याचं सूचक वक्तव्य
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात आले आहेत. अमित शाह यांना राजकारणाचं चाणक्य म्हटलं जातं. त्यांच्या बळावर भाजपने अनेक असाध्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य केल्या आहेत. ते पुण्यात असताना शिंदे सेनेच्या मंत्र्याने सूचक वक्तव्य केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुण्यात आले आहेत. आज पुणे जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अन्य नेते मंडळी उपस्थित राहतील. दरम्यान अमित शाह पुण्यात असताना एकनाथ शिंदे शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. “अमित शाह जिथे जातात तिथे आपला ठसा उमटवतात. इतिहास पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चित काही घडामोडी घडतील. राजकीय समीकरण असतील, इतर बाबी असतील. अमित शाहंच्या भेटीनंतर निश्चित चर्चा होईल” असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
“विलिनीकरण असेल 15-20 दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, इतर समीकरणं जुळवाजुळवीची चर्चा आहे, म्हणून अमित शाह यांनी वेळ घेतला असेल” असं संजय शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर विलिनीकरण होणार की ऑपरेशन टायगर असा प्रश्न निर्माण झालाय. रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात मफलर मॅनचा उल्लेख करतायत. हा मफलर मॅन कोण?. “अजित पवारांचा घात की अपघात हे प्रकरण निकाली निघालं पाहिजे” अशी संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “तुमच्याकडे माहिती असेल तर उघड करा. पोलिसांना सहकार्य करा. पोलीस कायदेशीर सहकार्य करतील” असं संजय शिरसाट म्हणाले.
मात्र अजूनही ही चर्चा थांबत नाहीय
“रोहित पवारांना स्टंटबाजी करायची सवय आहे. मागच्या 10 तारखेला ते पत्रकार परिषद घेणार होते. आता पुन्हा पीसी घेणार म्हणतायत. ही स्टंटबाजी आहे, चर्चेत राहण्याचा प्रयत्न आहे” अशी टीका भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाभोवती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा फिरत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार विलिनीकरणाचे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. मात्र अजूनही ही चर्चा थांबत नाहीय. शरद पवार रुग्णालयात दाखल होते, तेव्हापासून या सर्व चर्चा सुरु झाल्या. पार्थ पवार स्वत: दोनदा सिलवर ओकवर गेले होते.