शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देवीचरणी साकडं; श्रीकांत शिंदेंनीही मोठ्या पदावर जावं, गाऱ्हाण्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले…
Eknath Shinde News: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून डोंबिवलीत देवीला गाऱ्हाणं घालण्यात आले आहे. श्रीकांत शिंदेंच्या मोठ्या पदासाठीही प्रार्थना करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांची राजकीय वाटचाल यशस्वी होऊन त्यांनाही मोठे पद मिळावे, अशी इच्छा डोंबिवलीतील नवरात्रोत्सवादरम्यान देवीचरणी व्यक्त करण्यात आली आहे. डोंबिवलीतील डीएनसी मैदानावर नवरात्रोत्सवासाठी एकनाथ शिंदे आले असताना देवीला हे गाऱ्हाणं घालण्यात आलं. विशेष म्हणजे गाऱ्हाण्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही त्यावर प्रतिक्रिया देत, गाऱ्हाणं घातलं की ते खरं होतं, असं म्हटलं. त्यांचं वक्तव्य आता चर्चेत आले आहे.
या गाऱ्हाण्यात केवळ शिंदे पिता-पुत्रांच्या राजकीय भवितव्याबाबतच इच्छा व्यक्त करण्यात आली नाही, तर राज्यातील शेतकऱ्यांवरील दुष्काळाचं संकट दूर व्हावं आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थनाही करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनीही राजकारणात आणखी मोठ्या पदावर जावं, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गाऱ्हाण्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील सण-उत्सवांच्या परंपरेचा उल्लेख केला आहे.
यंदा येथे आल्यावर कोकणात आल्यासारखं वाटत असल्याचं ते म्हणाले. कोकणात शिमगा आणि गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गावाची ओढ प्रत्येकाला असते आणि सण-उत्सव ही आपली परंपरा आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याचं नमूद करत त्यांनी वारकरी बांधवांच्या भजनाचाही उल्लेख केला आहे. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना करूया, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
बळीराजा या संकटातून बाहेर पडेल, अशी आशाही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे. गाऱ्हाण्यात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय भवितव्याबाबत इच्छा व्यक्त झाल्यानंतर शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे या प्रसंगाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र देवीला घालण्यात आलेलं गाऱ्हाणं आणि त्यावरील प्रतिक्रिया यापलीकडे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.