नांदेडच्या शेतकऱ्यासोबत भयंकर घडलं, फायनान्स कंपनीवर कुटुंबीयांचे गंभीर आरोप
नांदेडच्या हिंगोली गेट परिसरातील खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. कर्जवसुलीसाठी डांबून ठेवल्याचा आणि मृत्यूबाबत संशय व्यक्त करत कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. नेमकं काय घडलं?

नांदेडच्या हिंगोली गेट परिसरात एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील चंद्रकांत दगडूजी शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत यांनी केवळ ७ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र त्यांच्याकडे ७५ हजार रुपयांची मागणी केली जात होती, असा दावा नातेवाइकांनी केला आहे. फायनान्स कंपनीच्या लोकांनी त्यांना डांबून ठेवून ठार केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
बाजारातून उचलून आणल्याचा नातेवाइकांचा आरोप
चंद्रकांत शिंदे यांना दोन दिवसांपूर्वी गावातील बाजारातून उचलून आणून डांबून ठेवण्यात आले होते, असा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. कर्जाच्या वसुलीसाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अवघ्या ७ हजार रुपयांच्या कर्जासाठी ७५ हजार रुपये वसूल करण्याची मागणी केली जात होती, असा दावा करण्यात आला आहे.
‘माझ्या मुलाने आत्महत्या केली नाही’
मृत शेतकऱ्याची आई सरास्याबाई दगडूजी शिंदे यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलाने जीवन संपविले नसून, फायनान्स कंपनीच्या लोकांनी त्याला डांबून ठेवून ठार केले, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे.
गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी काय सांगितल?
फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांच्याकडून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जात आहे, त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल. मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल घटनेची माहिती पोलिसांना केवळ १-२ तासांपूर्वीच मिळाली असून निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी प्राथमिक स्तरावर भाष्य करणे घाईचे ठरेल. तक्रार दाखल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची पोलीसाकडून चौकशी केली जाईल, प्राथमिक तपास झाला असल्याची माहिती नीलाभ रोहन, पोलिस अधिक्षक नांदेड यांनी दिली आहे.
खुनाचा गुन्हा दाखल
शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल, आरोपींना पकडण्यासाठी चमू गठित. कोणत्याही शेतकऱ्याला कुणीही त्रास देत तर त्यांनी थेट जिल्हा प्रशासनाशी संपर्क करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
