यवतमाळच्या पालकमंत्र्यांसह 17 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

यवतमाळ : बनावट कागदपत्र तयार करुन भूखंड बळकावल्याप्रकरणी यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळ येथील प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशावरून अखेर गुरुवारी उशिरा रात्री स्थानिक अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 11 कोटी रुपये किंमतीच्या वादग्रस्त भूखंड खरेदी-विक्री प्रकरणात हा गुन्हा नोंदविला गेला. आयुषी किरण देशमुख यांनी या प्रकरणी आधी …

यवतमाळच्या पालकमंत्र्यांसह 17 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

यवतमाळ : बनावट कागदपत्र तयार करुन भूखंड बळकावल्याप्रकरणी यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळ येथील प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशावरून अखेर गुरुवारी उशिरा रात्री स्थानिक अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 11 कोटी रुपये किंमतीच्या वादग्रस्त भूखंड खरेदी-विक्री प्रकरणात हा गुन्हा नोंदविला गेला.

आयुषी किरण देशमुख यांनी या प्रकरणी आधी पोलिसात फिर्याद दिली. परंतु राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हा नोंदविणे टाळल्याचा त्यांचा आरोप आहे. म्हणून आयुषी यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) राजकिरण इंगळे यांनी या प्रकरणात थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश 14 मे रोजी जारी केले. मात्र त्यानंतरही अवधूतवाडी पोलिसांनी दोन दिवसांनंतर गैरअर्जदारांना स्थगनादेशासाठी संधी देण्याचा प्रयत्न केला.

यानंतर आयुषीने पत्रकार परिषद घेऊन या भूखंड प्रकरणाचा भंडाफोड केल्याने  पोलिसांवर दबाव वाढला. स्पष्ट आदेश असताना अधिक टाळाटाळ करणे अंगलट येण्याची चिन्हे दिसताच अखेर गुरुवारी रात्री अवधूतवाडी पोलीस ठाण्यात 17 जणांविरुद्ध भादंवि 420, 426, 465, 468, 471, 34 आणि 120 (ब) कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले.

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे हे यात प्रमुख आरोपी आहेत. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. याशिवाय जयश्री ठाकरे, विजश्री कारेकर, जयंत कोल्हे, राजश्री उर्फ श्वेता देवतळे, तेजश्री थुटे, दिलीप कोल्हे, अर्चना कोल्हे, आशिष कोल्हे, वैशाली कोल्हे, अमोल कोल्हे, शीतल धोटे, अमित चोखाणी, भूमिअभिलेख विभागाचे येथील तत्कालीन उपअधीक्षक, यवतमाळ नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी आणि तत्कालीन सहायक दुय्यम निबंधक यात आरोपी बनविण्यात आले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 156 (3) अन्वये प्रकरण न्यायालयात आल्यास सहसा न्यायालय पोलिसांना प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देते. परंतु 11 कोटी रुपये किंमतीच्या 9241 चौरस फूट जागेच्या या प्रकरणात थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात पालकमंत्र्यांचे नाव नमूद असल्याने न्यायालयाने संपूर्ण कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास केला. तेव्हा त्यात याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार तथ्य आढळून आल्याने थेट गुन्हे दाखल करण्यास सांगण्यात आले. पोलिसांना आता यात केवळ कागदपत्रांची जुळवाजुळव तेवढी करावी लागणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

यवतमाळ शहराच्या अवधूतवाडी (कोल्हेची चाळ) येथील एकूण नऊ हजार 241 चौरस फूट जागेचे हे प्रकरण आहे. आजच्या बाजारभावानुसार त्याची किंमत 11 कोटी रुपयांच्या घरात आहे . 9241 चौरस फुटांपैकी 2309 चौरस फूट जागा किरण देशमुख यांनी खरेदी केली. परंतु त्यानंतरही कोल्हे कुटुंबीयांनी नियमानुसार 7887 चौरस फुटांऐवजी (देशमुख यांची जमीन कमी न करता) थेट 9241 चौरस फूट जागेची खरेदी मदन येरावार आणि अमित चोखाणी यांना 2013 ते 2016 दरम्यान करून दिली. या प्रकरणात किरण देशमुख यांची मालकी लपविण्यासाठी शासकीय कागदपत्रांमध्ये खोडतोडही केली गेल्याचा आरोप आहे. खरेदीपूर्वी मदन येरावार यांना या जागेत किरण देशमुख यांची मालकी असल्याचे निदर्शनास आणून दिले गेले. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून कोट्यवधींचा हा व्यवहार केला असे तक्रारदार आयुषी देशमुख यांनी आरोप केले.

या प्रकरणारवर पालकमंत्री मदन येरावार यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र या सर्व प्रकारांवर स्थगनादेश मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे. मात्र या सर्व प्रकरणानंतर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *