फी भरण्यासाठी संघर्ष, पैशांमुळे शिक्षणाला ब्रेक; आता लेकीच्या हातात जात वैधता प्रमाणपत्र पडलं अन् वडिलांना रडू कोसळलं, टीव्ही ९ मराठीचे मानले आभार
TV9 Marathi Impact: एका बातमीने महाराष्ट्रातील एका मुलीच्या भविष्याला नवी आशा मिळाली आहे. तिला जात वैधता प्रमाणपत्र मिळालं आहे. यामुळे लेकीच्या शिक्षणासाठी वडिलांचा संघर्ष फळाला लागला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर 58 लाख मराठा कुणबीच्या नोंदी आढळल्या. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा गावातील उमा ज्ञानेश्वर चव्हाण या विद्यार्थिनीची मराठा कुणबीची नोंद मिळाली. त्यानंतर तिच्या वडिलांना आवश्यक कागदपत्राच्या आधारे मराठा कुणबीचे जात प्रमाणपत्र मिळाले. त्या आधारावर उमा चव्हाण हिचा ओबीसी कोट्यातून हिंगोलीच्या तोंडापूर येथील कृषीतंत्र महाविद्यालयात दोन वर्षाच्या जिटीसीला नंबर लागला.
महाविद्यालयाने उमाचे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी जात वैधता पडताळणी समितीकडे पत्र पाठवले. साधारण दोन वर्षापर्यंत उमा चव्हाण यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. सलग दोन वर्ष उमाचे वडील काका यांनी कार्यालयाचे उंबरठे झिजवले. त्यामुळे उमा चव्हाण यांना दोन वर्षाची पूर्ण कोर्स फी भरावी लागली. पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्याने उमाचे शिक्षण थांबले. ओबीसीचे जात प्रमाणपत्र असताना ही उमा चव्हाण यांना ओबीसीच्या सवलतीचे कोणतेच फायदे न मिळाल्याने उमाचे शिक्षण रखडल्याची बातमी टीव्ही ९ मराठीने दाखवली होती.
त्यानंतर या बातमीचा टीव्ही ९ मराठीने पाठपुरावा केला असता उमा चव्हाणला काल ओबीसीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यानंतर उमाचे काका विलास चव्हाण यांनी टीव्ही ९ मराठीचे मनापासून आभार मानले आहेत टीव्ही ९ मराठीने जर बातमी लावली नसती तर आमच्या मुलीचं शिक्षण कायमचं रखडलं गेल असतं. टीव्ही ९ मराठीमुळे आमच्या मुलीला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया उमाचे काका विलास चव्हाण यांनी दिली आहे.
तर उमाचे वडील ज्ञानेश्वर चव्हाण यांचं टीव्ही ९ मराठीचे आभार मानताना ह्रदय भरून आलं होतं. त्यांना नीट बोलता येत नव्हतं. डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. यावेळी त्यांनी ढसाढसा रडत अश्रूला वाट मोकळी करून दिली. भावनाविवश होत उमाचे वडील ज्ञानेश्वर चव्हाण यांनी वैधता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर उमाने दिलेल्या प्रतिक्रियेचे कथन केले. टीव्ही ९ मराठीचे शतशः आभार. भविष्यात उमाला नौकरी लागली तर टीव्ही ९ मराठीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
