गोकुळ निवडणुकीत सतेज पाटीलच बॉस! आता हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यातले भांडण…
गोकुळ निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होत आहे. यावेळी सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13-12 अशा फरकाने विजय मिळवल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13-12 अशा फरकाने विजय मिळवला. महायुतीला 12 जागांवर समाधान मानावं लागलं, तर मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देताना महायुतीतील शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणं आणि त्यानंतर झालेली युती मतदारांना आवडली नसावी, असं म्हटलं. त्याचवेळी नव्या संचालक मंडळाला सहकार्य करण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
हसन मुश्रीफांनी नेमकं काय म्हटलंय?
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी दिलेला निकाल आम्ही स्वीकारत आहोत. या निवडणुकीत महायुतीमध्ये शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणे आणि त्यानंतर झालेली युती कदाचित लोकांना आवडलेली नसावी. बाद झालेली मतेही लक्षणीय आहेत. या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. गोकुळ दूध संघाचे नवीन संचालक मंडळ कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कुटुंबांचे कल्याण साधेल अशा शुभेच्छा. सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाच्या भूमिकेतून गोकुळ दूध संघाच्या उत्कर्षासाठी लागेल ते सहकार्य करू.
बातमी अपडेट होत आहे…
