मुश्रीफांच्या वर्चस्वाला धक्का! गोकुळ निवडणुकीतील विजयानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आता यापुढे…
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता असून, संघाचा कारभार एकमुखी आणि कोल्हापुरातूनच चालावा, अशी आमची आधीपासून भूमिका होती, असं ते म्हणाले.

गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता आहे. एकमुखी कारभारच गोकुळमध्ये पाहिजे, ही आमची आधीपासून भूमिका होती. त्यामुळे आम्हाला दुध उत्पादक शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला, गोकुळचा कारभार हा कोल्हापूरमधूनच चालावा, या भावनेतून आम्हाला मतं मिळाली, आमचा विजय मुश्रीफांनी स्वीकारायला पाहिजे होता, 5 ते 7 जागा आणखी जिंकलो असतो, अशी प्रतिक्रिया सतेज पाटलांनी दिली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले सतेज पाटील?
गोकुळच्या या निवडणुकीत कोल्हापुरातील दूध उत्पादकांनी जे बहुमत दिले, त्याबद्दल 550 शेतकऱ्यांसह ठरावधारकांचे आभार मानतो. सर्वसामान्यांनाही गोकुळमध्ये एकमुखी कारभार असावा, असे वाटत होते. जनरलमधील 98 मते बाद झाली आहेत. त्यातील 20 मते आमच्या चिठ्ठी चिन्हावर मारली होती. नाहीतर आमचे आणखी 7 ते 8 उमेदवार निवडून आले असते. लोकांचा कौल आमच्याच पॅनलच्या बाजूने होता. ही मते बाद ठरली नसती, तर आमच्या 20 जागा निवडून आल्या असत्या. पराभव खेळाडूवृत्तीने स्वीकारायला हवा होता. दोन उमेदवारांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली. बाद मते कन्फर्म केली होती. ही मते रिजेक्टेड होती, असं सतेज पाटलांनी म्हटलं आहे,
कायद्याला धरून फेरमतमोजणीची मागणी नव्हती, म्हणून अर्ज बाद केले. कोल्हापुरात सत्तेतले लोक हे करत होते, त्याला चपराक बसली. कालपर्यंत बोलणाऱ्यांना या जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी निकालातून उत्तर दिले आहे.
मुश्रीफ आणि चंद्रदीप नरके यांनी अर्ज द्यायला नको होता. विजय-पराभव खेळाडूवृत्तीने स्वीकारायला हवा होता. त्यांचे दोन शिलेदार अर्ज करत होते, त्यामुळे तीन तास वाया गेले. आमची आणखी 5 ते 7 माणसे निवडून आली असती, जर 98 मते वाया गेली नसती. नियमानुसार तारीख लागेल आणि चेअरमन निवडला जाईल.
मी आता टीकेत जाणार नाही. मला जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आमचे संचालक मंडळ न्याय देण्याची भूमिका बजावेल. महायुतीतील वाद त्यांच्यातला आहे, त्यांनाच माहिती. तुम्ही एकत्रच येणार होतात, तर वाद कशाला केला, हा माझा सवाल आहे. सत्तेत असलो की सगळेच आपले असते, असे काही लोक धरून चालले होते. अरुण डोंगरेंनी जे राजकारण केले, त्याचा फटका बसला असेल. आबाजी आमच्याकडे शेवटपर्यंत होते, पण ते तिकडे गेले.
लोकांच्या भावना होत्या, त्या लोकांनी व्यक्त केल्या. ही निवडणूक साडेपाच लाख शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लढवली. येत्या सहा महिन्यांत सर्व गोष्टींची अंमलबजावणी झालेली दिसेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
