Gokul Election 2026 : बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो, गोकुळच्या निवडणुकीसाठी मतदारांना शपथ देताना राष्ट्रवादीच्या नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
Gokul Election 2026 : कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीची चर्चा आहे. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. त्यासाठी सदस्य मतदारांना डोंगरावर नेऊन शपथा दिल्या जात आहेत.

भूषण पाटील, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी गोकुळची निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. त्यासाठी मंदिरात जाऊन मतदानाचा अधिकार असलेल्या सदस्यांना शपथा दिल्या जात आहेत. आता तर महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या मतदानाच्या दिवशी ठरावधारकांना शपथ देताना अकलेचे तारे तोडले आहेत. “बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. गेल्या निवडणुकीत ऐकाने बाळू मामाची शपथ मोडली. त्याच्या घराण्याला राजकीय हादरा बसला” असं धक्कादायक वक्तव्य माजी आमदार के. पी.पाटील यांनी केलं आहे.राज्यातील नेत्यांचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. के. पी.पाटील हे सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत.
“आमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चुकीचं काही करू नका” असा धनंजय महाडिक यांनी ठराव धारकांना दम दिला. मतदानाआधी आदमापुर येथील बाळूमामा मंदिर परिसरात महायुतीकडून मतदारांना शपथ देण्यात आली. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शपथा देण्याचा हा सिलसिला सुरु आहे दोन दिवसापूर्वी संघासाठी मतदान करणाऱ्या ठराव धारकांना महायुतीकडून सौंदत्ती डोंगरावर शपथ देण्यात आली.
आमच्या तालुक्याची अब्रू वाचवणं तुमच्याच हातात
सौंदत्ती डोंगरावर रेणुका देवीच्या परडी वर हात ठेवून शपथ घ्यायला लावली. सौदत्ती डोंगरावरील स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. “आमच्या तालुक्याची अब्रू वाचवणं तुमच्याच हातात आहे. काहीही खेळ करू नका. आमची तुम्हाला शपथ आहे. खोटं बोललं की देवी अंगावर उठते” असं ठराव धारकांना शपथ देताना मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य होतं. ठराव धारकांना देवीची शपथ देताना भाजप खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक देखील उपस्थित होते.
25 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात
आज कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. कोल्हापुरातील 12 तालुक्यातील 35 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. एकूण 5 हजार 418 मतदार हे मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत 25 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीमध्ये लढत आहे. उद्या निकाल जाहीर होईल. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.
