Devendra Fadnavis : पदवीधरच्या निवडणुकीतील एक गोष्ट मुख्यमंत्र्यांना खटकली, फडणवीस स्पष्टपणे बोलले एकनाथ शिंदेंनी याची दखल घ्यावी

Devendra Fadnavis : "फक्त पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत आहे. पण तिथे कुठलाही बेबनाव नाही, छत्रपती संभाजी नगरमध्ये सतीश चव्हाण राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. शिवसेना, भाजप त्यांच्यापाठिशी आहे. हे आमचे पाचही महायुतीचे उमेदवार निवडून येतील" असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

Devendra Fadnavis : पदवीधरच्या निवडणुकीतील एक गोष्ट मुख्यमंत्र्यांना खटकली, फडणवीस स्पष्टपणे बोलले एकनाथ शिंदेंनी याची दखल घ्यावी
Devendra Fadnavis-Eknath Shinde
| Updated on: Oct 18, 2026 | 1:21 PM

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आले आहेत. त्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती किती भक्कम आहे ते सांगितलं. “नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहेत. सुधाकर कोहळे आमचे उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार करण्यासाठी मी आलोय. शिक्षक, प्राध्यापक मंच आहे, त्यांच्याशी संवादाचा कार्यक्रम झाला. त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. शैक्षणिक क्षेत्रात आमच्या सरकारने काय काम केलय. या शिक्षण क्षेत्राला कसं महत्व दिलय. प्राध्यापक भरती आमच्या सरकारने सुरु केली आहे. हे सांगून मी मतं मागितली. मोठ्या प्रमाणात आमच्या उमेदवाराला मत मिळतील. वकिल, डॉक्टर संघटना यांच्याशी माझी चर्चा आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“दुसऱ्या पसंतीच्या मतांची आवश्यकता आम्हाला पडणार नाही. आमचे उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करतील” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीत आलबेल नाहीय, त्याचा फायदा होईल का? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटतं की, महाविकास आघाडी पहिल्यापासून अतिशय विभाजीत आहे. विशेषत: गटातटाचं राजकारण तिथे मोठ्या प्रमाणात आहे. भाजप महायुती म्हणून एकसंध राहून काम करत आहे. विशेषत: नागपूरचा विचार केला, तर ज्या पद्धतीने भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी हे आमचे गट काम करताना दिसतायत. काँग्रेस त्यांची आघाडी तशा प्रकारे काम करताना दिसत नाही”

Loading...

 शिवसेना काम करतेय?

“अमरावतीत किरण सरनाईक आमचे महायुतीचे उमेदवार आहेत. भाजपं पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात स्मिता जाधव महायुतीच्या उमेदवार आहेत. महायुती त्यांच्या पाठीशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं काही भागात प्राब्लय चांगलं आहे. तिथे सुनेत्रा वहिनींनी बैठक घेतली. कामाला लागायला सांगितलं. शिवसेना काम करतेय” असं फडणवीस म्हणाले.

सतीश चव्हाण यांच्यासाठी शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट प्रचार करतायत, या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अपेक्षा व्यक्त केली. “मला असं वाटतं की, मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितलय की, आम्ही महायुती सतीश चव्हाण यांच्यासोबत आहे. भाजप कामाला लागली आहे, एखाद्या व्यक्तीने वेगळी भूमिका घेतली म्हणून ती पक्षाची भूमिका मानली जात नाही. माझी अशी अपेक्षा आहे की, त्यांच्या पक्ष प्रमुखांनी याची दखल घेतली पाहिजे. जर, सगळे एकत्रित असताना अशी वेगवेगळी भूमिका घेणं पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिंदेंच्या दोन आमदारांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका

सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन आमदारांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. संजय शिरसाट यांनी सतीश चव्हाण यांना पाठिंबा दिला आहेत तर अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पक्ष प्रमुखांनी दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us