धावत्या ट्रेनमध्ये हनिमूनची तयारी,एसी कोच सजवला.. रेल्वेची झोपच उडाली, घेतला मोठा निर्णय; अखेर…
नांदेड-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये एका जोडप्याच्या हनिमूनसाठी केलेली फुलांची सजावट संबंधित व्यक्तींसाठी महागात पडली आहे. 'फर्स्ट एसी' (First AC) कोचमध्ये सजावट करण्यासाठी एका व्यक्तीने अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी रेल्वेने कठोर कारवाई केली आहे.

हनिमूनसाठी एका जोडप्याने धावत्या ट्रेनमध्ये एसी कोच सजवून घेतल्याची बातमी सध्या चांगलीच चर्चेत आहे. मात्र हनिमून करून आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी रेल्वेमध्ये आकर्षक फुलांची सजावट करणं आता त्या दांपत्याला चांगलंच महागात पडलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच सजावट करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध रेल्वे डब्यात अनाधिकृतपणे प्रवेश आणि विना तिकीट प्रवास केल्याचा ठपका ठेवत रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यार ते चांगलंच तापलं होतं. त्यामुळे रेल्वेनी याची गंभीर दखल घेतली आहे. सगळ्या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू आहे. या केसमध्ये जे दोषी आढळतील, त्याच्यांवर कारवाई करणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण ?
नांदेड वरून मुंबईकडे जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेसमधल्या फर्स्ट एसीच्या डब्यात एका दाम्पत्याने खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून आकर्षक फुलाची सजावट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या डब्यात फुगे, फुलांची सजावट, हजारो गुलाबाच्या पाकळ्या आणि भिंतीवर “I Love You” असा संदेश लावण्यात आला होता. रेल्वे चालू असतानाच डबा पूर्णपणे रोमँटिक वातावरणात सजवण्यात आला होता. त्या डब्यातील सजावटीचे फोटो, व्हिडीओही पाहता पाहता वाऱ्याच्या वेगाने पसरले. मात्र त्यावरून बरीच चर्चाा सुरू झाली. अनेकांनी याचं कौतुक केलं, पण काही सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित केले.रेल्वेच्या डब्यात अशा भव्य सजावटीला परवानगी आहे का? असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला. या सजावटीमुळे आग लागण्याचा धोका आहे का किंवा रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन होतं का? अशी चिंताही काहींनी व्यक्त केली.
एका कर्मचारी निलंबित
या सगळ्या प्रकारानंतर रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत या सजावट करणाऱ्या अजहर शेख वाहेद या व्यक्तीविरुद्ध रेल्वेच्या कायद्यानुसार रेल्वेच्या डब्यात अनाधिकृतपणे केलेला प्रवेश आणि विना तिकीट प्रवास केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. तसेच एका कर्मचाऱ्याला देखील निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर एका दाम्पत्याने हे सर्व काही हनिमून साठी केल्याची माहिती समोर आली. ज्यावेळी ही गाडी जालना रेल्वे स्थानकावर आली तेव्हा जालना येथील सजावट करणाऱ्या एका खासगी व्यक्तीने अनाधिकृतपणे नंदिग्राम एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणी असलेल्या वातानुकूलित डब्यात अनधिकृत प्रवेश केला. आणि त्या कुपेमध्ये त्याने आकर्षक फुलांची सजावट केली असल्याच बोललं जात आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागी झालं.दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर फर्स्ट एसी सारख्या अतिसुरक्षित डब्यात सजावट करणाऱ्या अनाधिकृत व्यक्तीचा प्रवेश आणि या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान घडलेल्या या सगळ्या प्रकरणाची आता विभागीय चौकशी सुरू झाली असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे देखील रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल.
याशिवाय, संबंधित डेकोरेटरविरुद्ध रेल्वे कायद्यातील विद्यमान तरतुदींनुसार रेल्वे गाडीत अनधिकृत प्रवेश, विनातिकीट प्रवास तसेच अनधिकृतपणे रेल्वे परिसरात प्रवेश (ट्रेसपासिंग) केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले असून, घटनेची सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.