दुर्दैवी घटना! अमरावतीत हायड्रा क्रेनची पाच मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Amravati Accident News: अमरावतीत हायड्रा क्रेनची पाच मजुरांना धडक बसल्याने मोठा अपघात झाला आहे. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले आहेत.

अमरावती जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील यावली शहीद-अडगाव मार्गावर भीषण अपघात घडला आहे. पायी जाणाऱ्या पाच मजुरांना मागून आलेल्या हायड्रा क्रेनने धडक दिली आहे. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. तसचे त्यांच्या कुटुंबासोबत संपर्क पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचही मजूर अडगावकडून यावली शहीदच्या दिशेने पायी जात होते. याचवेळी मागून आलेल्या हायड्रा क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात अन्य दोघे जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे राजेश बायस्कर, दिनेश आणि मदारी अशी आहेत. तर पिंटू चव्हाण आणि राजू पानसे हे दोघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
या अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेले तिघे आणि जखमी झालेले दोघेही मध्य प्रदेशातील बक्की चिखली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व मजूर यावली शहीद-अडगाव मार्गावरून पायी जात असताना हा अपघात घडला. ही घटना माहुली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत तीन मजुरांचा जीव गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताबाबत पुढील तपशील आणि पोलिसांच्या तपासाची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणी पंचनामा करण्याचा काम सुरू आहे. या तसेच पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
