शिवसेनेच्या कार्यकर्त्याची जमीन हडप?, बळजबरीने खरेदी व्यवहार केल्याचा संजय जाधव यांच्यावर आरोप

शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जाधव यांनी शिवसेनेचे दिवंगत कार्यकर्ते स्वप्नील काळे यांची जमीन बळजबरीने हडप केल्याचं काळे यांच्या कुटुंबीयांनी म्हटलंय. (Shiv Sena Sanjay Jadhav property)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:29 AM, 18 Jan 2021
शिवसेनेच्या कार्यकर्त्याची जमीन हडप?, बळजबरीने खरेदी व्यवहार केल्याचा संजय जाधव यांच्यावर आरोप

परभणी : शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जाधव यांनी शिवसेनेचे दिवंगत कार्यकर्ते स्वप्नील काळे यांची जमीन बळजबरीने हडप केल्याचं काळे यांच्या कुटुंबीयांनी म्हटलंय. तशी तक्रार काळे कुटुंबीयांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. या तक्रारीनंतर काळे यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत संजय जाधव यांनी प्रॉपर्टी बळजबरीने हडप केल्याचा आरोप केला आहे. मात्र आपल्यावरील आरोप धादांत खोटे असून हा व्यवहार पारदर्शी पद्धतीने झाल्याचं खासदार संजय जाधव यांनी सांगितलं आहे. (illegal property purchasing allegations against Shiv Sena MP Sanjay Jadhav)

प्रकरण काय?

शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिवंगत स्वप्नील काळे यांची प्रॉपर्टी बळजबरीने हडप केल्याचा आरोप काळे यांच्या कुटुंबीयांनी केलाय. स्वप्नील काळे यांची परभणी वसमत मुख्य रस्त्यावरील झीरो फाटा येथे साडे सहा एकर जमीन आहे. त्यातील 3 एकर 35 गुंठे जमीन जाधव यांनी स्वप्नील काळे यांच्या वडिलांकडून बळजबरीने खरेदी केली. तसेच ती जमीन आपली पत्नी क्रांती जाधव यांच्या नावे करून घेतली, असा आरोप काळे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. स्वप्नीलचे वडील रामप्रसाद काळे यांच्या नावावर असलेली ही कोट्यवधीची जमीन केवळ 44 लाख रुपयांत खरेदी केली आहे. तसेच या व्यवहारात पैसे दिले असल्याचं भासवण्यासाठी चेकव्दारे व्यवहार करण्यात आला. तत्पूर्वी स्वप्नील काळे यांच्या वडिलांकडून खासदार संजय जाधव यांनी घेतलेल्या कोऱ्या चेकच्या आधारे दिलेली रक्कम जाधव यांनीच काढू घेतली. तसेच या व्यवहारात तलाठी, बँक व्यवस्थापन आणि त्यांच्याच भावकीतला एकजण सहभागी असल्याचा गंभीर आरोप काळे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

“जाधव यांनी हडप केलेली जमीन वडिलोपार्जित असून आम्हाला ही जमीन विकण्याची काहीच आवश्यकता नाही. खासदार आमच्या कुटुंबातील सदस्यांसारखे असताना त्यांनी आम्हाला या व्यवहाराबद्दल काहीच कल्पना दिली नाही. स्वप्नील काळे यांच्या जाण्याने त्यांचे वडील तनावात होते. शिवाय बायको, सून, आणि मुलीच्या सहमतीशिवाय हा व्यवहार झाला आहे,” असं काळे यांच्या कुटुंबीयांनी जाधव यांच्यावर आरोप करताना म्हटलंय.

जाधव यांनी महसूल बुडवला

काळे यांच्या वडिलांकडून जमीन खरेदी करताना संजय जाधव यांनी सरकारचा मोठा महसूल बुडवल्याचाही गंभीर आरोप जाधव यांच्यावर होतोय. जाधव यांनी हडप केलेली जमीन ओलीत असताना जमीन खरेदी करताना जाधव यांनी तिला कोरडवाहू दाखवले. तसेच कोरडवाहून जमीन खरेदी केल्याचे सांगत शासनाचा महसूल बुडवला, असा आरोप स्वप्नील काळे यांच्या कुटुंबीयांनी केला. तसेच, जमिनीवर ताबा मिळविण्यासाठी जाधव यांच्याकडून गुंडांकरवी आम्हाला धमकावले जात असल्याचंही काळे यांच्या कुटुंबियांनी म्हटलंय. शिवाय जाधव यांनी जमिनी लाटून लाटून कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोप पेडगाव येथील शिवसैनिक सुहास पेडगावकर यांनीही केला आहे.

दरम्यान, स्वप्नील काळे यांच्याकडून जमीन खरेदी करताना सर्व नियमांचे पालन केलेले आहे. तसेच, कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे स्पष्टीकरण संजय जाधव यांनी दिले आहे.

संबंधित बातम्या :

‘जिंतूर बाजार समितीचा प्रश्न मोठा नाही’, उद्धव ठाकरेंचा संजय जाधव यांना फोन, राजीनामा मागे घेण्याची सूचना

(illegal property purchasing allegations against Shiv Sena MP Sanjay Jadhav)