IMD Monsoon Update : जूनमध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार? आयएमडीचा नवा अंदाज समोर

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, यंदा तब्बल बारा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, दरम्यान जून महिन्यात देशभरात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण कसं असेल याबाबतचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज समोर आला आहे.

IMD Monsoon Update :  जूनमध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार? आयएमडीचा नवा अंदाज समोर
राज्यातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
| Updated on: May 27, 2025 | 10:10 PM

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, यंदा तब्बल बारा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, दरम्यान जून महिन्यात देशभरात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण कसं असेल याबाबतचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज समोर आला आहे. यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा जून महिन्यात पावसाचं प्रमाण दीर्घकाली सरासरीच्या तुलनेत 108 टक्के इतकं असणार आहे.यंदा जूनमध्ये पडणारा पासून मागच्या 16 वर्षांचं रेकॉर्ड मोडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जून महिन्यात उत्तर-पश्चिम भारतामध्ये पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता आहे. तर पूर्वोत्तर भारतात मात्र कमी पाऊस पडू शकतो.

भारतीय हवामान विभाग आयएमडीचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा मध्य आणि दक्षिण भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. आयएमडीने सोमवारी म्हटलं आहे की, यंदा मान्सून आपल्या सामान्य वेळेपेक्षा 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे.1950 नंतर असं पहिल्यांदाच घडलं आहे. तर दुसरीकडे यंदा भारताच्या मुख्य भूमीवर देखील मान्सूनचं आगमन हे वेळेआधीच झालं आहे. 2009 नंतर म्हणजे तब्बल 16 वर्षांनंतर भारतात मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे.

सामान्यपणे मान्सून एक जूनला केरळमध्ये प्रवेश करतो, तर 11 जूनला मुंबईमध्ये दाखल होतो.आठ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशाला व्यापतो. तर 17 सप्टेंबरापासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो. 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून देशातून माघारी जातो. मात्र यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला असून, सरसारीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्राला पावसानं झोडपलं

दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्राला पावसानं प्रचंड झोडपलं आहे, गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे. कोकणासह विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. यंदा मे महिन्यातच नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे. मुंबईत देखील गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाला आहे.