IMD Rain Alert : पावसाचा सर्वात मोठा अलर्ट, पुढचे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे, या भागात पाऊस बरसणार!
राज्यातील कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात 20 ते 23 ऑक्टोबर या काळात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

Maharashtra IMD Rain Alert : राज्यात सध्या पावसाने दडी मारली आहे. परतीच्या वेळी तरी पाऊस बरसेल अशी शेतकरी आशा लावून बसलाय. परतीचा चांगला पाऊस झाला तर रबी हंगामातील पिकं चांगली येतील, अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. सध्या सातारा, कोल्हापूर तसेच अन्य काही जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांत तुरकळ पाऊस झालाय. त्यामुळे आगामी काळात एखादा जोरदार पाऊस होणार का? असे विचारले जातेय. असे असतानाच आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारा एक अंदाज समोर आलाय. हा अंदाज खरा ठरला तर दुष्काळाची झळ काहीशी कमी होण्याची शक्यता आहे.
सागरात नेमकं काय घडतंय? काय बदल होतोय?
सध्या देशाला लागून असलेल्या अरबी समुद्रात तसेच बंगालच्या खाडीत वातावरणीय बदल होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे. तर दुसरीकडे बंगालच्या खाडीच्या आसपास चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्यासारखे बदल घडून येत आहेत. यासह थायलंडची खाडी तसेच म्यानमारच्या आजूबाजूला तयार झालेले चक्रीवादळाची स्थिती उत्तर अंदमानाच्या दिशेने येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या एकंदरित स्थितीमुळे आगामी काळात बंगालच्या खाडीत आणखी एक कमी दबावाचे क्षेत्र तयार होऊ शकते. याचा परिणाम म्हणून दक्षिण भारत आणि अंदमना निकोबर द्वीपसमूहात पाऊस होऊ शकतो.
महाराष्ट्रासाठी नेमका अलर्ट काय?
अरबी समुद्र, बंगालच्या खाडीत सध्या होत असलेल्या वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्राला महत्त्वाचा अलर्ट देण्यात आलाय. राज्यातील कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात 20 ते 23 ऑक्टोबर या काळात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मराठवाड्यात 20 ते 21 ऑक्टोबर या काळात पाऊस होऊ शकतो. या काळात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नसली तरीही काही ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता मात्र आहे. त्यामुळे हा पाऊस आला तर राज्यात काही भागात शेतकरी सुखावू शकतो. रबी हंगामातील पिकांसाठी हा पाऊस संजीवनी ठरू शकतो.
