ठाकरे बंधूंमध्ये दोन तासांपेक्षाही अधिक वेळ बैठक, युतीची घोषणा कधी? सर्वात मोठी बातमी समोर

मोठी बातमी समोर आली आहे, आज उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर आता घडामोडींना वेग आला आहे.

ठाकरे बंधूंमध्ये दोन तासांपेक्षाही अधिक वेळ बैठक, युतीची घोषणा कधी? सर्वात मोठी बातमी समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2025 | 3:05 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘शिवतीर्थ’वर जाऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. कौंटुबिक भेटीनंतर ठाकरे बंधुंमध्ये आज पहिल्यांदाच राजकीय बैठक झाली आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल सव्वादोन तास बैठक झाली. शिवतीर्थावरील या बैठकीला संजय राऊत आणि अनिल परबही उपस्थित होते.

समोर आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी ‘शिवतीर्थ’वर गेल्याची चर्चा सुरू आहे. यावेळी दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये तब्बल सव्वा दोन तास चर्चा झाली. या चर्चेला अनिल परब आणि संजय राऊत यांची देखील उपस्थिती होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये यावेळी पालिका निवडणुकींच्या वाटाघाटींची पहिली बैठक पार पडली आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे येत्या दसरा मेळाव्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान या भेटीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंसोबत मनसेबाबत चर्चा झाली आहे, मनसेबाबत हायकमांडसोबतच्या चर्चेनंतर निर्णय होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे समविचारी पक्षांसोबत जाण्यासाठी नेहमीच तयार आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. अधिकृतरित्या आमच्यामध्ये बैठका सुरू आहेत, असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. दरम्यान ठाकरे आणि मनसे यांची युती झाली तर महायुतीला फारसा फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास काही होणार नाही, असं भाजप नेते मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या कौटुंबीक भेटीनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय भेट झाली आहे.